
कुडाळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कृषी महाविद्यालय, दापोलीच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत ‘कृषिरत्न’ समुहाकडून गोठोस गावात शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या (ATIC) उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास उद्यानविद्या महाविद्यालय मुळदे येथील डॉ. संदीप गुरव, प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग तसेच डॉ. राजेश राठोड, प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. संदीप गुरव सर यांच्या हस्ते कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शास्त्रशुद्ध शेती पद्धती तसेच कृषीविषयक नवीन तंत्रज्ञानाचा योग्य वापर याबाबत मार्गदर्शन केले. डॉ. राजेश राठोड यांनीही शेतकऱ्यांच्या भातावरील रोगविषयक विविध प्रश्नांना मार्गदर्शन करून आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास जिल्हा परिषद शाळेचे प्राचार्य तावडे सर यांचीही प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या उपक्रमाचे कौतुक करून शेतकरी व ग्रामीण भागासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व अधोरेखित केले. गोठोस गावात या उपक्रमाच्या आयोजनासाठी विष्णू तामणेकर यांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले. त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन यशस्वीपणे पार पडण्यास मोठी मदत झाली.
या कार्यक्रमाला गोठोस गावातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. शेतकऱ्यांनी तज्ज्ञांशी संवाद साधून विविध कृषीविषयक प्रश्नांची माहिती घेतली. कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, शास्त्रशुद्ध शेती पद्धती आणि कृषीविषयक उपयुक्त माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये आधुनिक व तंत्रज्ञानावर आधारीत शेतीबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होण्यास मदत होणार आहे.
सदरचा कार्यक्रम हा कु. हर्षवर्धनसिंह पाटील, कु. संभाजी शिंगणे, कु. शंतनु बनकर, कु. संकल्प शिराळकर, कु. ईश्वर आव्हाड, कु. प्रणव चौरे, कु. अनिरुद्ध भिसे, कु. सुरेश थेवर यांनी आयोजित केला होता. तसेच हे कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र वृंदावन दूध संकलन केंद्र हॉल मध्ये शेतकऱ्यांच्या माहितीसाठी उपलब्ध आहे.










