
सावंतवाडी : तांबोसे परिसरात 'ओंकार' या हत्तीचा वावर वाढल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तीने बागायतींमध्ये घुसून विविध पिकांचे नुकसान करण्यास सुरुवात केली असून, वारंवार होत असलेल्या या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत.
तांबोसे परिसरातील बागायती आणि शेतीवर हत्तीच्या वावराचा परिणाम होत आहे. रात्रीच्या वेळी हत्ती बागायतींमध्ये शिरून पिकांची नासधूस करीत असल्याने शेतकऱ्यांना आपल्या पिकांची राखण करावी लागत आहे. मेहनतीने तयार केलेली पिके हत्तीच्या हल्ल्यात काही वेळातच उद्ध्वस्त होत असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
हत्तीचा वावर वारंवार होत असल्याने परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी शेतकरी आणि स्थानिकांना बागायती परिसरात जाणे धोकादायक ठरत आहे. त्यामुळे हत्तीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी तसेच पिकांचे नुकसान रोखण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
'ओंकार'चा वावर कोणत्या भागात आहे', याची पाहणी करून त्याला सुरक्षितपणे जंगल परिसरात परत पाठवावे, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात
हत्तीचा तातडीने बंदोबस्त करून शेतकरी व बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी स्थानिक पंच दया गवंडी यांनी केली आहे. वन विभागाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा स्थानिकांनी व्यक्त केली आहे.










