
दोन दिवसांपूर्वी या देशातील सुमारे 23 लाख नीट परिक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना NTA (National Testing Agency) या नीट ही परिक्षा संचलित करणार्यां भंगार यंञणेने अक्षरश: रस्यावर आणले. रस्त्यावर आलेल्या लाखो विद्यार्थ्यांचे नेतृत्व भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व काँग्रेसप्रणीत एन एस यू आय या विद्यार्थी संघटनेने केला. नेहमीप्रमाणेच हा विषय आणखीन दहा बारा दिवस मिडियात चघळला जाईल. शिल्लक असलेले विरोधक थोडीफार ओरड करतील. सरकार एखाद्या सरकारी यंत्रणेला चौकशी करायला लावेल आणि पुढच्या सगळ्या गोष्टी 'रे माझ्या मागल्या'.
खरे तर लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणारा आणि आपल्या पाल्यांच्या सोनेरी स्वप्नांचा चुराडा करणारी ही अतिशय गंभीर घटना आहे. याठिकाणी कोणत्या सरकारच्या कारकीर्दीत हा अक्षम्य असा गुन्हा झाला हा प्रश्न गौण आहे. आपण या विषयावर राजकारण न करता गांभीर्याने विचार करणार आहोत की नाही ? कधीतरी या निवडणुकीच्या मोडमधून बाहेर येवून संवेदनशीलता दाखवणार आहोत की नाही? अशा ज्या गुन्ह्याचा ज्या तपास यंञणा तपास करतात त्यांच्या बाबत आणि एकंदरीत न्यायपालिकेबाबत जनतेचा कितपत विश्वास आहे ?असे सर्वसामान्यांना अनेक प्रश्न भेडसावत आहेत.
NEET, नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट जी एम.बी.बी.एस व बिडीस या वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाते. या ज्या स्पर्धा परिक्षा घेतल्या जातात त्यांच्या पेपरफुटीचे प्रकार हे वारंवार घडत असतात. ते काँग्रेसचे सरकार असतानाही घडले आणि आताही सुरू आहे. यावर्षीचा प्रकार तर भयंकर चीड आणणारा आहे. पण राज्यकर्ते याचा गांभीर्याने विचार करताना दिसत नाही.
२०२४ च्या याच परिक्षेच्या निकालात अचानक तब्बल ६७ टाॅपर विद्यार्थ्यांचे वाढलेले गुण ज्यानां पैकीच्या पैकी म्हणजे तब्बल ७२० गुण मिळाले होते. याबाबत जेव्हा संशय व्यक्त करण्यात आला आणि तपासाची सुञे हालली तेव्हा बिहार पाटणा व झारखंड मधून आरोपी पकडले गेले. ज्यांनी लाखो रुपयांना प्रश्नपत्रिका विकल्या होत्या. कहर म्हणजे सुरुवातीला या भंगार कारभार करणार्या एनटीएने हा आरोप फेटाळला. माञ जेव्हा तपास यंत्रणांनी सत्य उजेडात आणले तेव्हा ही तथाकथित, NTA मुग गिळून गप्प बसली. ही परिक्षा नियंञित करणार्या या सरकारी यंत्रणेवर व संबंधित अधिकाऱ्यांवर सरकार काही कडक कारवाई करणार आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे.
NTA च्या या अशा बेजबाबदार व दळभद्री कारभारामुळे अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले सर्वस्व पणाला लावून अहोरात्र कष्ट करणारे जे लाखो विद्यार्थी व त्यांचे कुटुंबीय मानसिक दडपणातून आज जात आहेत,त्यांचा विचार आपण कधी करणार आहोत ?परिक्षा नियंञीत करणार्यां या व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर आणि कार्यपद्धतीवर मा.सर्वस्व न्यायालयाने वेळोवेळी नाराजी व्यक्त करुन कान उघडणी केलेली आहे. पण ही मुर्दाड व्यवस्था अजिबात सुधारत नाही.
काय दोष आहे या विद्यार्थ्यांचा? डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहिले हा दोष आहे का ? अनेक पालक तर आपली परिस्थिती नसताना आपला मुलगा,मुलगी डॉक्टर व्हावी म्हणून पोटाला चिमटा काढून मोठ्ठ्या शहरात महागड्या ट्युशनला लाखो रुपये भरून कर्जबाजारी होतात, दागदागिने, जमीन जुमले विकतात, गहाण ठेवतात.
ही नीट परिक्षा रद्द झाल्यावर अशाच एका दुर्देवी पालकचा फोन आला ज्याच्या मुलाने तीन मे रोजी परिक्षा दिलेली होती.ही बातमी जेव्हा त्या मुलाने समाज माध्यमावर ऐकली तेव्हा तो प्रचंड डिस्टर्ब झाला. तो आपल्या वडिलांना म्हणाला ," बाबा मला पेपर खूपच सोपा गेलाय, मला विश्वास होता की मी नीट नीटपणे पार पाडीनचं पण आता पुन्हा जर पेपर कठीण गेला तर? आता सांगा हा गमावलेला विश्वास त्या मुलाचा तुम्ही परत कसा मिळवून देणार आहात ? की असाचं खेळ खेळत रहाणारं आहात ? लाखो विद्यार्थी व पालकांचा कोणताही दोष नसताना त्यांना या अशा अपयशी यंञणेमुळे मनस्ताप सहन करावा लागत असेल तर यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
अॅड. नकुल पार्सेकर
सामाजिक कार्यकर्ते














