
दोडामार्ग : घोटगेवाडी येथे तिलारी नदीच्या प्रवाहात चिमुकल्यासह वाहून गेलेल्या युवकाचा अद्याप शोध लागलेला नसतानाच शोधमोहीम थांबविण्यात आली आहे. घोटगेवाडीपासून कुडासेपर्यंत शोध घेण्यात आला; मात्र त्यापुढील नदीपात्रात शोध का घेण्यात आला नाही? याबाबत प्रशासनाकडून स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे बेपत्ता युवकाच्या शोधासाठी मोहीम पुढे का नेण्यात आली नाही? असा प्रश्न नदीकाठच्या ग्रामस्थांकडून उपस्थित होत आहे.
सोमवारी सायंकाळी घोटगेवाडी येथे ही दुर्घटना घडली. घटनेनंतर मंगळवार आणि बुधवार या दोन दिवशी बचाव पथकांनी नदीपात्रात शोध घेतला. मंगळवारी दुपारी शोधादरम्यान चिमुकल्याचा मृतदेह सापडला. मात्र, त्याच्यासोबत वाहून गेलेल्या अनुरंजन किसपोट्टा या युवकाचा अद्याप कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. घोटगेवाडीपासून कुडासेपर्यंतच्या भागात शोध घेण्यात आला. या ठिकाणी युवकाचा शोध न लागल्याने नदीच्या प्रवाहाच्या पुढील दिशेने शोधमोहीम वाढविणे अपेक्षित होते. मात्र, कुडासेनंतरच्या भागात शोध घेण्यात आला नसल्याने याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
पावसाळ्यात नदीचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढलेला असतो. त्यामुळे पाण्याबरोबर वाहून गेलेली व्यक्ती घटनास्थळापासून बर्याच अंतरावर जाण्याची शक्यता असते. अशावेळी नदीचा प्रवाह, पाण्याची दिशा, नदीपात्रातील अडथळे तसेच पुढील परिसराचा विचार करून शोध घेणे आवश्यक ठरते. या बाबींचा आढावा घेण्यात आला होता का, याबाबतही माहिती समोर आलेली नाही.
शोध थांबविण्याचे कारण काय?
चिमुकल्याचा मृतदेह सापडला असला तरी युवकाचा शोध लागलेला नाही. त्यामुळे शोधमोहीम आणखी काही काळ सुरू ठेवण्याची आवश्यकता नव्हती का? असा सवाल ग्रामस्थांकडून केला जात आहे. शोध थांबविण्यामागे पथकांची उपलब्धता, नदीतील धोकादायक परिस्थिती, हवामान किंवा आवश्यक साधनसामग्रीचा अभाव यापैकी कोणते कारण आहे, हे प्रशासनाने स्पष्ट करणे गरजेचे आहे. तसेच शोधमोहीम थांबविण्याचा निर्णय नेमका कोणत्या स्तरावर घेण्यात आला? पुढील नदीपात्राचा आढावा घेण्यात आला का? आणि परिस्थिती अनुकूल झाल्यास पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे का? याची माहितीही प्रशासनाने देणे आवश्यक आहे.
कुटुंबीयांची प्रतीक्षा कायम
चिमुकल्याचा मृतदेह मिळाल्यानंतर त्याच्यासोबत वाहून गेलेल्या युवकाचा शोध लागेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दोन दिवसांच्या प्रयत्नांनंतरही अनुरंजन किसपोट्टा याचा शोध लागलेला नाही. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली आहे. आपल्या माणसाचा ठावठिकाणा समजेपर्यंत कुटुंबीयांची प्रतीक्षा कायम राहणार आहे. घोटगेवाडी ते कुडासे या भागात शोध घेण्यात आला असून, त्यापुढील नदीपात्राचा शोध घेण्याबाबत प्रशासनाने भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आढळल्यास पोलिसांना कळवावे
शोधमोहीम सध्या सुरू आहे की थांबविण्यात आली आहे, याबाबत तालुका आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख तथा तहसीलदार राहुल गुरव यांच्याशी संपर्क साधला असता, शोधमोहीम बंद करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बेपत्ता अनुरंजन किसपोट्टा यांच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास अथवा ते कुठे आढळून आल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले.










