LIVE UPDATES

जिल्हा परिषदेतील अपक्षांची कोंडी

स्वनिधी आणि 15 व्या वित्त आयोगाचा विकास निधी मिळेना? : मतदार संघातील विकासकामांवर परिणाम
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 21:15 PM
views 120  views

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीच्या विरोधात अपक्ष म्हणून निवडून आलेल्या सहा सदस्यांची सध्या काहीशी कोंडी झाल्याचे चित्र आहे. सत्ताधारी महायुतीविरोधात भूमिका घेत ठाकरे शिवसेना पक्षासोबत गट स्थापन केल्याने या सदस्यांना विकास निधीच्या बाबतीत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची राजकीय गोटात चर्चा सुरु आहे.

जिल्हा परिषदेच्या १५ व्या वित्त आयोगासह स्वनिधीतून या सदस्यांच्या मतदारसंघांना निधी मिळत नसल्याची चर्चा सुरु आहे. त्यामुळे निवडून आल्यानंतरही आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी उपलब्ध करून घेणे त्यांच्यासमोर आव्हान ठरत आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेत सहा अपक्ष सदस्य निवडून आले आहेत. या सर्वांनी ठाकरे शिवसेने सोबत  हातमिळवणी करून स्वतंत्र गट स्थापन करत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. यापूर्वी जिल्हा परिषदेत अपक्ष म्हणून निवडून आलेले सदस्य अनेकदा सत्ताधाऱ्यांना पाठिंबा देत आपल्या मतदारसंघातील विकासकामांसाठी निधी मिळवून घेत असत.

मात्र, यावेळी अपक्ष सदस्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात राहण्याचा निर्णय घेतल्याने त्याचा परिणाम त्यांच्या राजकीय वाटचालीवर आणि विकासकामांवर होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या अपक्ष सदस्यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांचे श्रेय सत्ताधारी गटातील पदाधिकारी आणि सदस्यांना मिळत असल्याची स्थिती आहे. त्यामुळे निवडून आलेले अपक्ष सदस्य मात्र विरोधी बाकावर बसून आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी निधी मिळविण्याची प्रतीक्षा करत आहेत.