LIVE UPDATES

लाकडी खेळणी, गंजीफासाठी युनेस्को मार्फत पाठवणार प्रस्ताव

इको सेन्सिटिव्ह झोन, आयुष ओपीडीवरही ठराव : नगराध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 13:29 PM
views 56  views

सावंतवाडी : शहराला इको-सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावे, आयुष मंत्रालय ओपीडीसाठीच्या सामंजस्य कराराच्या मसु‌द्याला मान्यतेसह लाकडी खेळणी, लाखकाम व गंजिफा यांना युनेस्को मार्फत सांस्कृतिक वारसा मानांकनासाठी प्रस्ताव पाठवण्याबाबचे ठराव घेण्यात आले. नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या अध्यक्षतेखाली नगरपरिषदेची विशेष सभा लोकमान्य टिळक सभागृहात पार पडली. 

याप्रसंगी नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले, उपनगराध्यक्ष ॲड. अनिल निरवडेकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, सभापती आनंद नेवगी, सुधीर आडीवरेकर, प्रतीक बांदेकर, दिपाली भालेकर, ॲड. निता सावंत-कविटकर, देव्या सूर्याजी,  स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, ॲड. सायली दुभाषी, नीलम नाईक, अजय गोंदावळे, बाबू कुडतरकर, देवेंद्र टेमकर, सुकन्या टोपले, ॲड. सिद्धार्थ भांबुरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते.

बैठकीत भारत सरकार, पर्यावरण वन व हवामान बदल मंत्रालय यांच्या पश्चीम घाट इकोलॉजीकल सेन्सीटिव्ह क्षेत्र संबंधित मसुदा अधिसुचनेच्या अनुषंगाने सावंतवाडी शहर व ह‌द्दीवर होणारा संभाव्य परिणामांचा विचार करुन शहराला इको सेन्सिटिव्ह झोनमधून वगळण्यात यावे असा ठराव घेण्यात आला.

सावंतवाडी नगरपरिषदेने एक मसुदा तयार करून प्रत्येक प्रभागातील हरकती नोंदवून घेतल्या जाव्यात आणि बांधकाम ठेकेदार, हाॅटेल व्यवसायिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मसुद्यावर आपली भूमिका मांडावी म्हणून नगरपरिषदेने पुढाकार घ्यावा, असे नगरसेवक ॲड. निता कविटकर सावंत, आनंद नेवगी, अजय गोंदावळे, खेमराज कुडतरकर, सिध्दार्थ भांबुरे यांनी सुचविले. नगराध्यक्षा सौ. भोसले यांनी इको- सेन्सिटिव्ह झोन सावंतवाडी शहरात नको म्हणून जनजागृती करून प्रत्येक प्रभागातील नागरिकांनी हरकती नोंदविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले.

तसेच सावंतवाडीत केंद्र सरकारच्या अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान, गोवा यांना ओपीडी बाह्यरुग्ण विभाग चालू करण्यासाठी सावंतवाडी नगरपरिषद व अखिल भारतीय आयुर्वेद संस्थान यांच्यामध्ये होणा-या सामंजस्य कराराच्या मसु‌द्याला मान्यता देण्याबाबत सभागृहात मंजूरी देण्यात आली. आयुष मंत्रालयाच्या मागणीनुसार पाणी, वीज बील अन् कर माफ करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. तसेच ओपीडीत शहरवासियांना दिला आहे. नगरपरिषद मोफत वीज व पाणी देण्यासाठी तयार आहे. मग, केस पेपरला पैसे घेऊ नये असे करारात नमूद असावे असे ठरविण्यात आले. नगरसेवक देव्या सुर्याजी यांनी स्वातंत्र्य दिनी यासाठी धरणे आंदोलन छेडले होते. त्यानंतर यावर विशेष सभेच आयोजन करून निर्णय घेण्यात आला. शहरवासियांना मिळणार असलेल्या रूग्णसेवेबाबत नगरसेवक देवा टेमकर यांनी नगरसेवक श्री. सुर्याजी व सावंतवाडी नगरपरिषदेचे अभिनंदन केले. 

तसेच सावंतवाडी पारंपारिक लाकडी खेळणी, लाखकाम व गंजिफा काईस यांचे जतन व संवर्धन करुन युनेस्को मार्फत सांस्कृतिक वारसा मानांकनासाठी प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला. 

यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले म्हणाल्या, इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळावे यासाठी ठराव घेण्यात आला आहे‌‌. इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास अनेक बंधन शहरावर येणार असल्याने हा ठराव घेण्यात आला असून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच आयुष मंत्रालय ओपीडीसाठी इलेक्ट्रीसीटी, पाणी, टॅक्स त्यांच्या मागणीनुसार मोफत देण्याचे ठरले असून त्यांच्याकडून केस पेपरसाठीची सुविधा शहरवासियांना मोफत देण्यात यावी असा ठराव घेण्यात आला आहे. तसेच सावंतवाडीची लाकडी खेळणी, गंजीफा यांना युनेस्को मार्फत सांस्कृतिक वारसा मानांकनासाठी प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. 

तसेच मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्या जागेत व्हावं यासाठीच संपूर्ण सहकार्य आम्ही केलं आहे‌. युवराज लखमराजे भोंसले यात स्वतः लक्ष घालत आहे. सर्व कागदपत्रे आम्ही सादर केली असून न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे‌. ताज पंचतारांकित हॉटेल सिंधुदुर्गात होत असल्याने पर्यटन विकासाला चालना मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तर आजच्या सभेस अनुपस्थित असलेल्या मुख्याधिकाऱ्यांबाबत विचारलं असता, पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच लक्ष वेधले आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना वेळ देणं शक्य होत नाही. एसआयआरमुळे ही गोष्ट थांबली होती‌. मात्र, पुढच्या दोन महिन्याच्या आत आम्हाला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेल अशी खात्री असल्याचा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.