LIVE UPDATES

इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळावं

आयुष ओपीडीचा मार्ग मोकळा : मल्टीस्पेशालिटीला राजघराण्याचं पूर्ण सहकार्य : नगराध्यक्षा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 13:01 PM
views 112  views

सावंतवाडी : इको सेन्सिटिव्ह झोनमधून सावंतवाडी शहर वगळावे यासाठी ठराव घेण्यात आला आहे‌‌. इको सेन्सिटिव्ह झोन लागू झाल्यास अनेक बंधन शहरावर येणार असल्याने हा ठराव घेण्यात आला असून तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच आयुष मंत्रालय ओपीडीसाठी इलेक्ट्रीसीटी, पाणी, टॅक्स त्यांच्या मागणीनुसार मोफत देण्याचे ठरले असून त्यांच्याकडून केस पेपरसाठीची सुविधा शहरवासियांना मोफत देण्यात यावी असा ठराव घेण्यात आला आहे अशी माहिती नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांनी दिली. आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या.

तसेच सावंतवाडीची लाकडी खेळणी, गंजीफा यांना युनेस्को मार्फत सांस्कृतिक वारसा मानांकनासाठी प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय विशेष सभेत घेण्यात आल्याची माहिती नगराध्यक्षांनी दिली. तर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल त्या जागेत व्हावं यासाठीच संपूर्ण सहकार्य आम्ही केलं आहे‌. युवराज लखमराजे भोंसले यात स्वतः लक्ष घालत आहे. सर्व कागदपत्रे आम्ही सादर केली असून न्यायालयाच्या निर्णयाची प्रतिक्षा आहे‌. ताज पंचतारांकित हॉटेल सिंधुदुर्गात होत असल्याने पर्यटन विकासाला चालना मिळणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तर आजच्या सभेस अनुपस्थित असलेल्या मुख्याधिकाऱ्यांबाबत विचारलं असता, पुर्णवेळ मुख्याधिकारी मिळावा यासाठी पालकमंत्री नितेश राणेंच लक्ष वेधले आहे. त्यांच्याकडे अतिरिक्त पदभार असल्याने त्यांना वेळ देणं शक्य होत नाही. एसआयआरमुळे ही गोष्ट थांबली होती‌. मात्र, पुढच्या दोन महिन्याच्या आत आम्हाला पूर्णवेळ मुख्याधिकारी मिळेल अशी खात्री असल्याचा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.