LIVE UPDATES

"क्रांतीवीराला अखेरचा सलाम "

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: October 09, 2026 10:22 AM
views 58  views
#kokansadlive#news update#konkan update#

अँड.नकुल पार्सेकर :

 आज सकाळीच अघटित बातमी कानावर पडली.नटसम्राटाने कायमची एक्झिट घेतली.आता नाटकाच्या  पहिल्या अंकाचाही पडदा वर जाणार नाही.प्रेक्षागृहात सन्नाटा पसरला.विश्वनाथने सगळ्या कलोक्षेञाला कायमचे बाय बाय केले.पाळण्यातील नाव विश्वनाथ असले तरी अवघ्या भारतवर्षाला नाना या टोपण नावानेच परिचित. 

अनेकदा परिस्थिती माणसाला बिघडवते आणि सावरते.अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपले बालपण व्यतीत करणार्‍या नानाने वेळोवेळी त्या प्रतिकूल परिस्थितीत संधी शोधली आणि त्याचे सोने केले.लहानपणीच चिञकलेची आवड त्यामुळे बोर्ड रंगवून जे चार पैसै मिळायचे ते आपल्या शिक्षणाला वापरायचे.नानांची ही अंगभूत  कला ओळखून काही मिञांच्या सहकार्याने नानानी मुंबईतील सुप्रसिद्ध अशा जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मधून  पदवी घेतली.शिकत असताना त्यांची रेखाटन पाहून मुंबई पोलीस त्याना सापडत नसलेल्या गुन्हेगारांची माहीती देत असत आणि नाना ती फक्त ऐकीव वर्णनावरून  हुबेहुब रेखाचित्र काढत असत.

 चित्रकलेबरोबर त्यांना अभिनयाची प्रचंड आवड.सुरूवातीला प्रायोगिक रंगभूमीवर आपल्या अभिनयाला त्यानी सुरूवात केली.१९७८ ला त्यानी " गमन" हा पहिला हिंदी चित्रपट केला.त्यानंतर अनेक चिञपटात छोट्या मोठ्या भूमिका केली.सहजपणे प्रेक्षकांच्या काळजाला भिडणारा अभिनय ही नानांची खासीयत. १९८६ पासून नानांचा या चित्रपट सृष्टीत खऱ्या अर्थाने सुवर्णकाळ सुरू झाला.अंकुश,परिंदा, प्रहार, क्रांतिवीर, तिरंगा ,अग्निसाक्षी, खामोशी,गुलाम ए - मुस्तफा,वेलकम,अपहरण असे एकापेक्षा एक असे अनेक चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरले.

 नटसम्राट या मराठी चित्रपटाने तर चार चांद लावले.पुरुष या नाटकातील भूमिकेमुळे त्या व्यक्तिरेखेचा टोकाचा तिरस्कार करणारे प्रेक्षक तर नटसम्राट या चिञपटातील भूमिकेमुळे प्रेक्षकांच्या सहानुभूतीवर आरूढ होणारे गणपतराव बेलवलकर .परस्पर दोन विभिन्न स्वभावाच्या व्यक्तिरेखा नानाने मोठ्या ताकदीने पार पाडल्या.२०१३ मध्ये नानाना भारत सरकारचा पद्मश्री हा पुरस्कार मिळाला.

  कलाक्षेत्रात आपल्या अफाट अभिनयामुळे त्यानी जसा नावलौकिक मिळवला तसा सामाजिक क्षेञातही नानांचे नाव अधोरेखित झाले.शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्याचे काम नानानी सुरू केले.२०१५ मध्ये नानानी आपले कलाक्षेत्रातील सहकारी श्री मकरंद अनासपुरे यानां बरोबर घेऊन दुष्काळग्रस्त मराठवाड्याचे दौरा केला.आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींचा आक्रोश ऐकून नानाही फार दु:खी झाले.सरकार,राजकारणी आणि व्यवस्था यांची वाट न पहाता आपणही समाजाचे देणं लागतो या भावनेने नानानी मकरंद अनासपुरे यानां बरोबर घेऊन नाम  

फाऊंडेशनची स्थापना केली.सातत्याने गेली अकरा वर्ष नाना या फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्याचे काम करत होते.नानांचा स्वभाव अगदी रोखठोक. सर्व पक्षातील राजकारण्यांशी त्यांचे सलोख्याचे संबंध पण ते चुकीच्या गोष्टींचे कधीच समर्थन करत नसत.कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कान उपटायचे काम ते बिनधास्तपणे करत असत.स्वातंत्र्यानंतर सुमारे पंचाहत्तर वर्ष उलटून गेली तरी आपण सर्वसामान्य माणसाना त्यांच्या मुलभूत गरजा आपण पूर्ण करू शकत नाही याला आजची ही भ्रष्टाचाराने सडलेली व्यवस्था जबाबदार आहे हे दु:ख ते बोलून दाखवत. 

 का कुणास ठाऊक पण दोन दिवसापूर्वी जो गोव्यात कार्यक्रम झाला तेव्हा ते अगदी निर्वाणीचे बोलत होते.नानाना खरंच आपल्या मृत्यूची चाहूल लागली होती का ?खरं तर आज जी दुष्काळाची भिषण परिस्थिती आहे अशावेळी नानांचे जाणे हा फार मोठा आघात आहे.नाना हे अगदी फणसा सारखे होते,बाहेरून काटे पण आतून गोड,प्रेमळ.

  नानांच्या जाण्याने सिनेसृष्टी ,नाट्यसृष्टी पोरकी झाली पण या महाराष्ट्रातील शेतकरीही पोरका झाला.नाना हे सामाजिक क्रांतीचे द्योतक होते.आज हा  सतत धगधगणारा क्रांतीवीर आपल्या धरणीमातेच्या कुशीत शांतपणे विसावला.क्रांतीवीराला अखेरचा सलाम.