
कलाकार म्हणून जगणं वेगळं आणि कलाकार असताना माणूस म्हणून आपलं व्यक्तिमत्त्व चाहत्यांच्या मनात कायमचं कोरणं त्याहून अवघड असतं. मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीच्या इतिहासात हे दुर्मीळ 'दिव्य' ज्यांनी करून दाखवलं, ते म्हणजे 'नाना पाटेकर!' नानांच्या निधनाची बातमी आज सकाळी कानावर पडली आणि अक्षरशः काही क्षण विश्वासच बसला नाही. ज्या व्यक्तीच्या जाण्याची आपण कल्पनाही केलेली नसते, तिच्या निधनाचं वास्तव स्वीकारण्याची वेळ अचानक आपल्यावर यावी, हा धक्का तसाच असतो. नुकतच गोव्याच्या भूमीतून नानांचं अत्यंत सुंदर, नेहमीप्रमाणेच प्रेरणादायी भाषण जगभरातील त्यांच्या चाहत्यांनी ऐकलं होतं, आणि त्यानंतर अचानक आलेली त्यांच्या निधनाची बातमी मन सुन्न करून गेली.
काही दिवसांपूर्वी गोव्यातील प्रसिद्ध फोमेंतो समूहाचे चेअरमन आदरणीय अवधूत तिंबलो सरांनी नाना पाटेकर यांना आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरवली येथील 'आराकीला' या पंचतारांकित हॉटेलमध्ये निमंत्रित केलं होतं. त्यावेळी मलाही उपस्थित राहण्याचा योग जुळून आला होता.
फोमेंतो समूहाच्या एका टीमने मोचेमाड खाडीत बनविलेल्या खास इलेक्ट्रिक हाऊस बोटीतून नाना पाटेकर, अवधूत तिंबलो सर आणि त्यांच्या टीमसोबत मी अशी एकत्रित सफर केली होती. त्या प्रवासात चित्रपटातले नाना आणि प्रत्यक्ष आयुष्यातले नाना यांच्यातील फरक समजून घेण्याची एक विलक्षण संधी मिळाली.
अभिनय, समाज, निसर्ग, देशभक्ती आणि माणूसपण अशा अनेक विषयांवर आमच्या मनमोकळ्या गप्पा रंगल्या. ते कलाकार म्हणून सर्वश्रेष्ठ आहेतच; पण माणूस म्हणून त्यांचे विचार त्याहून मोठे आहेत. ‘नाम फाउंडेशन’च्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागासाठी उभं केलेलं काम हे त्यांच्यातील संवेदनशील माणसाची साक्ष देतं. केवळ व्यासपीठावरून भाषणं करणं नव्हे, तर प्रत्यक्ष मदतीसाठी पुढे येणं, ही त्यांची वृत्ती त्यांच्या प्रत्येक कृतीतून दिसते.
त्यांच्या एका भाषणातील विचार आज पुन्हा पुन्हा आठवतो, इतकंच कमवा की जे आपल्या ओंजळीत सामावेल; पण त्या ओंजळीतून सांडण्यापूर्वी ते गरजूंच्या हातात द्या. कारण माणसाची खरी गरज ही त्याच्या ओंजळीत मावेल एवढीच असते. किती साधा…पण किती मोठा विचार!
नानांनी देशभक्तीपर चित्रपटांमध्ये भूमिका केल्या. अनेक व्यक्तिरेखा पडद्यावर अक्षरशः जिवंत केल्या. मात्र विशेष बाब अशी की पडद्यावर त्यांनी ज्या विचारांची, ज्या मूल्यांची आणि ज्या देशप्रेमाची अभिव्यक्ती केली, तेच विचार त्यांच्या प्रत्यक्ष आयुष्यातही दिसून येत होते. त्यांची जीवनशैलीही त्यांनी स्वतः निवडली होती. गावाकडचं साधं जगणं, निसर्गाच्या सान्निध्यात राहणं, मातीशी नातं जपणं आणि आपल्या पद्धतीने आयुष्य जगणं, यामध्येच त्यांना खरं समाधान मिळत होतं.
त्या भेटीत त्यांनी या सगळ्या गोष्टी अत्यंत मनापासून सांगितल्या. त्यांच्यासोबत घालवलेले ते काही क्षण आज आठवले की एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. एखादा माणूस केवळ कलाकार म्हणून नव्हे, तर व्यक्तिमत्त्व म्हणून किती उत्तुंग असू शकतो, याचा तो प्रत्यक्ष प्रत्यय होता. खरंतर आजचा दिवस आमच्यासाठी आमच्या वडिलांच्या पुण्यस्मरणाचा दिवस. अशा भावनिक वातावरणात सकाळी नानांच्या निधनाची बातमी समजली आणि मनात अक्षरशः पितृतुल्य व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना निर्माण झाली.
निसर्गावर प्रेम करणारे, कोकणावर प्रेम करणारे, देशावर प्रेम करणारे, अभिनयावर जीवापाड प्रेम करणारे आणि त्याचवेळी समाजासाठी प्रत्यक्ष काम करणारे नाना अचानक आमच्यातून निघून गेले. त्यांची ती भेट मी कधीही विसरू शकणार नाही. कारण त्या दिवशी पडद्यावर दिसणारे नाना मला प्रत्यक्ष भेटले होते, पण आश्चर्याची गोष्ट अशी की, पडद्यावर दिसणाऱ्या नानांपेक्षाही प्रत्यक्षातले नाना मला अधिक उत्तुंग दिसले. माझ्या हृदयात नानांसाठी कायमची जागा आहे. ती त्यांच्या अभिनयामुळे नव्हे…तर त्यांच्या माणूसपणामुळे! नाना, तुमचा आवाज थांबला असेल…तुमची पावलं थांबली असतील… पण तुमचे विचार, तुमच्या भूमिका आणि तुमचं माणूसपण आमच्या मनात कायम जिवंत राहील. सध्या महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना तुमच्या माणुसकीचा ओलावा बळीराजाला हिंम्मत देणारा ठरला असता. नाम फाउंडेशन आपलं काम करेलच, परंतु बळीराजाला जगण्याची हिंम्मत देणारं नाना नावाचं 'खास पॅकेज' आता आमच्यासोबत नसेल, ही दुष्काळापेक्षाही तीव्र जखम कायम वेदना देत राहील.
सागर चव्हाण
मुख्य संपादक, कोकणसाद













