
दिवसाची सुरुवात अशा बातमीने कधी होऊ नये, दुर्दैवाने आज ती झाली. नाना पाटेकर गेल्याचे सकाळच्या चहाच्या आधीच समजले आणि खूप अस्वस्थता आली. काही दिवसांपूर्वीच, दीड ते दोन तास नानाच्या समोर बसून त्याच्या गप्पा ऐकण्याची संधी मिळाली होती. नानाचे विस्तृत वाचन, सामाजिक बांधीलकीच्या जाणीवेतून चालवलेले प्रकल्प, सद्यस्थितीवरील त्याची मतं याबद्दल ऐकताना नानाबद्दल आदर वाढतच गेला. पडद्यावर आणि स्टेजवर बघितलेला नाना आवडणारा होताच; समोर बसून ऐकलेला नाना त्या दिवशी मनाला अधिक भावला.
लिननची पांढरी शॉर्टपँट, पांढरा-हलक्या राखाडी रंगाच्या आडव्या पट्ट्यांचा टीशर्ट आणि गळ्यात पांढराशुभ्र पंचा अशा अवतारात नाना आमच्या कार्यालयात आला होता. आमच्या फोमेंतो उद्योगसमूहाचे चेअरमन अवधूत तिंबलो आणि नाना जवळचे मित्र. त्या दिवशी गप्पांच्या सत्रात सहभागी होण्याची संधी मला आणि माझ्या काही सहकाऱ्यांना मिळाली, कायमच स्मरणात राहतील असे क्षण अनुभवता आले.
नानाच्या कथित विक्षिप्तपणाबद्दल खूप ऐकले होते. परंतु हा माणूस विक्षिप्त अजिबात नाही, उलट रोखठोक, स्पष्टवक्ता आणि मनस्वी आहे, ‘नो नॉनसेन्स’ प्रकारचा आहे हे त्या दिवशी अनुभवले. अनेक क्षेत्रांबद्दलचे अफाट ज्ञान आणि मराठीएवढ्याच सहजतेने अस्खलित इंग्रजीतून संवाद साधण्याचे कसब असा वेगळाच नाना बघायला मिळाला.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांसाठी मकरंद अनासपुरेंच्या सोबत नाम फाउंडेशन स्थापन करून चालवलेले नानाचे कार्य अतुलनीय आहे. काश्मीरमध्ये हिंसाचाराची झळ बसलेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठी लष्कराच्या सहकार्याने चालवलेले कार्य ठाऊक आहे. नानाची सामाजिक बांधीलकी तेवढ्यावर थांबली नाही. प्रवासात, कार्यक्रमादरम्यान, चित्रीकरणाच्या वेळी, अशा कसल्याही प्रसंगी समोर आलेल्या नवोदिताच्या धडपडीत प्रामाणिकपणा जाणवला तर त्याला अथवा तिला काही ना काही माध्यमातून मदत केल्याशिवाय नाना स्वस्थ बसला नाही. त्या दिवशी गप्पांच्या ओघात अशी काही उदाहरणे समजली आणि नानाबद्दलच्या आदरात भर पडली.
‘‘गेल्या एक जानेवारीला पंच्याहत्तर वर्षांचा झालो, पण मी व्यायाम थांबवलेला नाही’’, असे सांगणारा नाना ‘स्लीम अँड फिट’ म्हणावा असाच होता. गोव्यात त्याचं घर आहे. ‘‘सिंधुदुर्गात समुद्राच्या जवळ जमीन घेऊन छोटंसं घर बांधायचंय, घराच्या बाजूला मोकळ्या जागेत बागायत, लागवड करायची आहे’’, असे तो म्हणाला होता. एक दोन ठिकाणी जागा बघूनही आला होता.
पण पूर्णपणे फिट दिसणारा नाना सिंधुदुर्गातील घराचे स्वप्न मागे ठेवून अचानक निघून गेला. श्रद्धांजली वाहण्यापलिकडे आपल्या हाती काही नाही, हे वास्तव तेवढे राहिले!
संजय ढवळीकर
संपादक संचालक, कोकणसाद
माजी माहिती आयुक्त, गोवा राज्य













