
सिंधुदुर्गनगरी : माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायणराव राणे यांच्या अमृतमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ हा विशेष उपक्रम हाती घेण्यात आला आहे. गुरुवार, १५ ऑक्टोबरपासून जिल्ह्यातील गावोगावी पोहोचणाऱ्या या यात्रेचा शुभारंभ कणकवली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, नांदगाव येथे सकाळी ११ वाजता होणार आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते, खासदार नारायण राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी दिली.
‘सक्षम आरोग्य, समृद्ध समाज’, ‘आरोग्य सेवा आपल्या दारी’ या संकल्पनेतून तसेच ‘माझे गाव आरोग्यसंपन्न गाव’ आणि ‘सुदृढ समाज, निरोगी समाज, सक्षम सिंधुदुर्ग’ या उद्दिष्टांवर आधारित ही आरोग्य यात्रा राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचविणे, विविध शासकीय आरोग्य योजनांची माहिती देणे आणि आरोग्यविषयक जनजागृती करणे, हा या उपक्रमामागील प्रमुख हेतू आहे.
आरोग्य तपासणीसह विविध कार्ड सुविधांचा लाभ
या यात्रेदरम्यान नागरिकांसाठी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यासोबतच आयुष्मान कार्ड, वय वंदना कार्ड आणि आभा कार्ड यांसंबंधी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्यविषयक सेवांचा लाभ मिळविणे अधिक सुलभ होणार आहे. शासकीय आरोग्य योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ घेण्याची प्रक्रिया नागरिकांपर्यंत पोहोचविण्यावरही भर दिला जाणार आहे.
शाळा, अंगणवाड्यांनाही भेटी; कुपोषणाचा घेतला जाणार आढावा
आरोग्य यात्रेदरम्यान गावांतील जन आरोग्य समित्यांचे अध्यक्ष व सदस्य तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींशी संवाद साधण्यात येणार आहे. त्याचबरोबर शाळा आणि अंगणवाड्यांना भेटी देऊन आरोग्य व स्वच्छतेच्या स्थितीचा तसेच कुपोषणाशी संबंधित बाबींचा आढावा घेतला जाणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्यविषयक समस्या जाणून घेऊन आरोग्य सेवांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास मदत होणार आहे.
जिल्ह्यातील नागरिकांनी ‘सिंधू जनसंवाद आरोग्य यात्रा’ उपक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, आरोग्य तपासणी करून घ्यावी आणि विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य सभापती प्रितेश राऊळ यांनी केले आहे.














