
कणकवली : हवालदार स्मिता माने मृत्यूप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला पती संशयित सचिन माने याला पोलीस कोठडीची मुदत संपल्याने गुरुवारी दुपारनंतर ओरोस येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने संशयित पतीला न्यायालयीन कोठडी सुनावली. संशयितातर्फे ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहीले. दरम्यान, स्मिता माने मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्नांची उत्तरे अद्याप गुलदस्त्यातच राहीली आहेत. शवविच्छेदन झाले असले तरी व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून मृत्यूचे ठोस कारण सीपीआर रुग्णालयाकडून तपास करणार्या कुडाळ पोलिसांना अद्यापही देण्यात आले नसल्याचे पोलिसांतर्फे न्यायालयासमोर सांगण्यात आले.
स्मिता यांच्या मृत्यूप्रकरणी स्मिता यांची बहिण रेश्मा जाधव यांनी फिर्याद दिली होती. सचिन यांच्या जाचाला कंटाळून स्मिता यांनी आत्महत्या केली असावी किंवा सचिन यानेच स्मिता यांचा घातपात केला असावा, असे फिर्यादीत म्हटले होते. त्यानुसारच संशयित सचिन याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. अखेर पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला आज गुरुवारी परत न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयाने पोलिसांनी केलेली पोलीस कोठडीची मागणी फेटाळत न्यायालयीन कोठडी सुनावली.
प्रश्न अनुत्तरीतच
स्मिता माने मृत्यूप्रकरणी अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहीले आहेत. स्मिता माने बिडवाडीच्या जंगलमय भागात नेमक्या कशा पोहोचल्या? त्या बसने, रिक्षाने गेल्या की त्यांना कुणीतरी नेऊन सोडले? हा मृत्यू गळफासानेच आहे की तसे भासवले जात आहे? जर हा घातपात असेल तर यात आणखीन कुणाचा सहभाग आहे का? असे अनेक प्रश्न अद्याप अनुत्तरीतच राहीले आहेत.














