LIVE UPDATES

भैरववाडीत यावर्षीही 'श्री गणेश मखर सजावट स्पर्धा'

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 18:26 PM
views 22  views

सावंतवाडी : भैरववाडी, गोसावीवाडी, डंगवाडी आणि भंडारीटेंब या परिसरामध्ये मागील दोन वर्षांपासून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असलेल्या 'श्री गणेश मखर सजावट स्पर्धे'चे यंदाचे तिसरे वर्ष अधिक भव्य आणि नव्या उत्साहात आयोजित करण्यात येणार आहे. मागील दोन वर्षांपासून होत असलेल्या या यशस्वी प्रवासात आतापर्यंत सहभागी झालेल्या सर्व ग्रामस्थांचे आणि स्पर्धकांचे आयोजकांनी मनापासून आभार मानले आहेत. यावर्षीची स्पर्धा अधिक यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सक्रिय सहकार्याची अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

यंदाच्या स्पर्धेमध्ये मखर सजावट स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकापासून ते उत्तेजनार्थपर्यंतची आकर्षक रोख बक्षिसे, तसेच "माझ्या बाप्पा समोरील रांगोळी" स्पर्धेसाठीची बक्षिसे निश्चित करण्यात आली आहेत. याशिवाय, कारिवडे गाव मर्यादित "मोस्ट व्हायरल बाप्पा" हे यंदाचे विशेष आकर्षण असणार आहे. यांसारख्या विविध स्पर्धा, ट्रॉफ्या, स्मृतीचिन्हे, प्रमाणपत्रे आणि इतर आयोजनासाठी नागरिकांनी हातभार लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे. मिळालेल्या प्रत्येक योगदानाचा वापर पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने केला जाईल आणि आयोजकांकडून सर्व दात्यांची नावे सन्मानपूर्वक जाहीर केली जातील. या भव्य उत्सवाविषयी अधिक माहितीसाठी ९१५८३०८८९९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.