LIVE UPDATES

कुसगेवाडीत दोन महिन्यांपासून वीजपुरवठा विस्कळीत झाल्याने ग्रामस्थांमध्ये नाराजी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 13:00 PM
views 143  views

दोडामार्ग : तालुक्यातील मांगेली ग्रामपंचायत हद्दीतील कुसगेवाडी येथे गेल्या दोन महिन्यांपासून वीजपुरवठा अत्यंत विस्कळीत झाला असून ४० हून अधिक घरांतील ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दररोज वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणापासून दैनंदिन कामांपर्यंत सर्वच गोष्टींवर त्याचा परिणाम होत आहे. वारंवार तक्रारी करूनही कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.

ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, गेल्या दोन महिन्यांपासून दररोज महावितरणचे वायरमन घटनास्थळी येऊन तांत्रिक बिघाड दूर करण्याचा प्रयत्न करतात. काही वेळ वीजपुरवठा सुरळीत सुरू होतो; मात्र अवघ्या एक-दोन तासांत पुन्हा वीज खंडित होते. दुसऱ्या दिवशी पुन्हा तोच प्रकार घडत असल्याने नेमका फॉल्ट कुठे आहे, याचा शोध अद्याप लागलेला नाही. या कामात ग्रामस्थ स्वतःही सहकार्य करत असूनही समस्या कायम असल्याने महावितरणच्या नियोजनाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे ग्रामस्थांनी सांगितले.

या समस्येबाबत साटेली-भेडशी येथील महावितरण कार्यालयाशी अनेकदा संपर्क साधण्यात आला. मात्र प्रत्येक वेळी वायरमन पाठविल्याचे उत्तर मिळते, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. वारंवार होणाऱ्या वीजखंडिततेमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून मोबाईल चार्ज करणे, घरातील दैनंदिन कामे तसेच गावात सुरू असलेल्या गणपती चित्रशाळेच्या कामातही अडथळे निर्माण होत आहेत. दोन महिन्यांपासून नियमित वीजपुरवठा मिळत नसतानाही वीजबिल मात्र वेळेवर भरावे लागत असल्याने या कालावधीतील बिलात सवलत मिळणार का, असा सवालही ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

कुसगेवाडीतील वीजपुरवठ्याचा कायमस्वरूपी प्रश्न तातडीने निकाली काढावा, अन्यथा ग्रामस्थांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा युवक प्रसाद प्रकाश गवस व सचिन हरिश्चंद्र गवस यांनी दिला आहे. "दोन महिने झाले आम्ही अंधार सहन करतोय. रोज तक्रार करतो, अधिकारी वायरमन पाठवतात; मात्र नेमका फॉल्ट शोधण्यात यश आलेले नाही. आम्ही आणखी किती दिवस हा त्रास सहन करायचा?" असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, याबाबत साटेली-भेडशी येथील महावितरणचे उपअभियंता सुहास वरुटे यांनी सांगितले की, कुसगेवाडीतील ग्रामस्थांची तक्रार मिळताच तातडीने वायरमन घटनास्थळी पाठविले जात आहेत आणि फॉल्ट शोधण्याचे काम सुरू आहे. समस्या कायम राहिल्यास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली विशेष गँग पाठवून नेमका तांत्रिक बिघाड शोधून तो कायमस्वरूपी दूर करण्यात येईल. कुसगेवाडीतील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे पूर्ण लक्ष असून ग्रामस्थांना लवकरात लवकर नियमित वीजपुरवठा मिळावा, यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.