
सावंतवाडी : न्हावेली परिसरात रानगव्यांचा वाढता वावर शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत असून पुन्हा एकदा गव्यांच्या कळपाने भातशेतीचे मोठे नुकसान केले आहे. लाडोबा रामचंद्र मांजरेकर यांच्या भात लावणीत मध्यरात्री गव्यांनी शिरून संपूर्ण लावणी पायदळी तुडवली. यात अंदाजे पाच हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
मांजरेकर यांनी मोठ्या कष्टाने आणि खर्च करून भात लावणी केली होती. मात्र मध्यरात्री गव्यांचा कळप शेतात शिरल्याने नव्याने केलेली लावणी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. त्यामुळे त्यांच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले असून, पुन्हा लागवड करण्याचे मोठे आर्थिक संकट त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. गेल्या काही महिन्यांपासून न्हावेली व परिसरात रानगव्यांचा मुक्त संचार वाढला असून, भातशेती, भाजीपाला आणि इतर पिकांचे सातत्याने नुकसान होत आहे. वन्यप्राण्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे शेतकरी हवालदिल झाले असून, शेती करणे दिवसेंदिवस कठीण बनत असल्याची भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
या घटनेनंतर नुकसानग्रस्त शेतकऱ्याने प्रशासनाने पंचनामा करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तसेच वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, शेतकऱ्यांना तातडीची मदत द्यावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. गव्यांच्या वाढत्या उपद्रवामुळे ग्रामीण भागातील शेतकरी चिंतेत असून, प्रशासनाने तातडीने लक्ष घालण्याची गरज व्यक्त होत आहे.











