LIVE UPDATES

पडद्यामागे घट्ट मैत्री ते पडद्यावर 'सत्या-मंजू'ची हिट जोडी

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 01, 2026 19:22 PM
views 25  views

मैत्री हे असं नातं आहे, जे प्रत्येक नात्याला अधिक सुंदर बनवतं. कलाकारांच्या बाबतीतही अनेकदा सेटवर जुळलेली मैत्री आयुष्यभराची ठरते, तर काही मैत्री सेटवर येण्याआधीच घट्ट झालेली असते. 'सन मराठी'वरील महाराष्ट्राची लाडकी मालिका 'इन्स्पेक्टर मंजू' मधील सत्या आणि मंजूची जोडी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. पडद्यावर त्यांची केमिस्ट्री जितकी मन जिंकते, तितकीच पडद्यामागे अभिनेता वैभव कदम आणि अभिनेत्री मोनिका राठी यांची अनेक वर्षांची मैत्रीही खास आहे.

फ्रेंडशिप डेच्या निमित्ताने वैभवने त्यांच्या मैत्रीबद्दल मनमोकळेपणाने सांगितले की, "मालिकेला आता अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र माझी आणि मोनिकाची मैत्री या मालिकेच्या आधीपासूनची, म्हणजे जवळपास सात-साडेसात वर्षांची आहे. आमची कौटुंबिक ओळखही तितकीच जुनी आणि घट्ट आहे. त्यामुळे सेटवर एकत्र काम करताना आमच्यातील कम्फर्ट आणि विश्वास आपोआप दिसून येतो. स्क्रीनवरील आमची केमिस्ट्रीही याच मैत्रीमुळे अधिक सहज आणि नैसर्गिक वाटते. मित्रांसोबत काम करताना कामाचा ताण जाणवत नाही. उलट सेटवरील वातावरण हलकं-फुलकं राहतं आणि प्रत्येक सीन करताना अधिक मजा येते."

तो पुढे म्हणाला, "मोनिका एक उत्कृष्ट अभिनेत्री आहे. 'इन्स्पेक्टर मंजू'च्या भूमिकेतून तिला संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरून प्रेम मिळत आहे. तिच्यात कोणताही बदल व्हावा असं मला वाटत नाही. ती जशी आहे, तशीच खूप छान आहे. मित्रांसोबत काम करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे रोमँटिक, भावनिक किंवा कॉमेडी कोणताही सीन अधिक नैसर्गिक होतो. विशेषतः कॉमेडी करताना आमच्यातील खरी मैत्री खूप उपयोगी पडते. आमच्यात कोणताही संकोच नाही. एखादी गोष्ट आवडली नाही, तर ती तशीच स्पष्टपणे सांगण्याइतका मोकळेपणा आणि विश्वास आमच्या मैत्रीत आहे. सध्या मालिकेत 'इन्स्पेक्टर मंजू'च्या मिशनचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा सुरू आहे. हे मिशन यशस्वी होणार का आणि 'सत्या-मंजू'ची जोडी या संकटावर कशी मात करणार, हे प्रेक्षकांना लवकरच पाहायला मिळेल."