
कणकवली : कणकवली नगरपंचायतीत तब्बल ४० वर्षे प्रामाणिक व अविरत सेवा बजावून सेवानिवृत्त झालेल्या कर्मचारी मनोज धुमाळे यांचा नगरसेवक, माजी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवासस्थानी जाऊन सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
या सत्कार प्रसंगी माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, नगरसेवक संजय कामतेकर व राकेश राणे, माजी उपनगराध्यक्ष बाबू गायकवाड, माजी बांधकाम सभापती अभी मुसळे, माजी नगरसेवक अभय राणे, सामाजिक कार्यकर्ते,औदुंबर राणे, महेश सावंत, चारू साटम, अमोल रासम, प्रशांत (बाळा) सावंत, पंकज पेडणेकर, शिवसुंदर देसाई आणि बाळा पाटील उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक राकेश राणे म्हणाले, मनोज धुमाळे यांनी गेली चार दशकांच्या सेवाकाळात नगरपंचायतीच्या विविध कामांमध्ये मोलाचे योगदान दिले. विशेषतः कणकवली शहरातील नळपाणी योजना अविरत सुरू राहावी, यासाठी त्यांनी सातत्याने मेहनत घेतली. त्यांच्या कार्यनिष्ठेचा आणि सेवाभावाचा हा गौरव असल्याचे राणे यांनी सांगितले. उपस्थितांनी मनोज धुमाळे यांच्या प्रामाणिक सेवाभावाचे कौतुक करत त्यांच्या निवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद आणि यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.











