LIVE UPDATES

सावंतवाडी नगरपरिषदेचे नवे पार्किंग धोरण

हे रस्ते 'वन वे' घोषित : नगराध्यक्षांच्या उपस्थितीत वाहतूक कोंडीवर चर्चा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 20:27 PM
views 166  views

सावंतवाडी : शहरात वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी आणि आगामी १५ ते २० वर्षांचा विचार करून शहरात नवे पार्किंग धोरण राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नगराध्यक्षा श्रद्धाराजे सावंत-भोसले यांच्या अध्यक्षतेखाली आणि शहरातील प्रमुख नागरिक, लोकप्रतिनिधी, पोलीस प्रशासन व व्यापारी संघटनांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत या नव्या पार्किंग धोरणाची रूपरेषा स्पष्ट करण्यात आली. या नव्या धोरणानुसार शहरात उघड्यावर कुठेही चारचाकी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली असून, दुचाकी, तीन आसनी व सहा आसनी रिक्षांसाठी स्वतंत्र पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत.

या बैठकीस पोलीस निरीक्षक राजेंद्र मकदूम, एसटी आगार व्यवस्थापक गौतमी कुबडे, परिवहन अधिकारी संकेत चोमनमी, सभापती आनंद नेवगी, सभापती दिपाली भालेकर, सभापती सुधीर आडीवरेकर, सभापती प्रतिक बांदेकर, नगरसेवक तौकीर शेख, सौ निलम नाईक, दुलारी रांगणेकर, स्नेहा नाईक, शर्वरी धारगळकर, सायली दुभाषी, अजय गोंदावळे, मोहीनी मडगावकर, सुनिता पेडणेकर, सुकन्या टोपले, रिक्षा युनियनचे सरचिटणीस सुधीर पराडकर, व्यापारी संघटनेचे जगदीश मांजरेकर,पुंडलिक दळवी, बाळ बोर्डेकर,श्रीपाद चोडणकर, सहा आसनी व तीन आसनी रिक्षा युनियनचे पदाधिकारी, टेम्पो संघाचे प्रतिनिधी, सतीश नार्वेकर, विशाल सावंत, दत्ताराम सावंत, संदेश परब,मदन गावडे आदी  मान्यवर उपस्थित होते.

बैठकीत बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या, शहरातील लोकसंख्या आणि वाहनांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यापूर्वी २०१२ मध्ये पार्किंग धोरण लागू करण्यात आले होते. मात्र, आता शहराची संरचना  बदलल्याने नव्याने नियोजन करणे गरजेचे झाले आहे. सभापती प्रतीक बांदेकर यांनी या नव्या पार्किंग आणि नो-पार्किंग मसुद्याचे वाचन केले. यात चारचाकी आणि दुचाकी पार्किंग झोन निश्चित करण्यात आले आहेत. टू व्हीलरसाठी रघुनाथ मार्केट सभोवताली, राऊत परब दुकान ते एक्सपर्टो बेकरी, व्यायामशाळा ते अंकुर महिला केंद्र, शांतीनीकेतन ते मॅंगो हॉटेल स्लॅब, बँक ऑफ इंडिया समोरील गटारावर, इंदिरा गांधी व्यापारी संकुल लगत, कावेरी हॉटेल समोर, मोती तलाव नजीक, एक्सेस बँक समोर जागा निश्चित करण्यात आली आहे. तर चारचाकीसाठी प्रितम ऑटो मोबाईल लगत नाला, आत्मेश्वर मंदिर बाजूने, वृद्धाश्रम, आरपीडी गेट पासून राखीव जागा, भिसे उद्यान ते शाळा क्र. २ तिठा, डॉ. स्वार समोरील रस्ता, बस स्टॅण्ड समोर, केसरकर कॉम्प्लेक्स समोर, वाचन मंदिर, पर्णकुटी ते बांदेकर हॉटेल राखीव जागेत आरक्षीत ठेवल आहे. तर मालवाहू गाड्यांसाठी लेस्टर गेट ते साधले मेस, बाप्पा नार्वेकर संकुल, बेळगाव रोड, जुना उपरल नाका आदी जागा नेमुन दिली आहे.

तसेच खासगी बस पार्किंगसाठी पेड पार्किंग जिमखाना मैदान प्रवेशद्वाराजवळ, निर्माण भवन बांधकाम नजीकची जागा, सिमेंट्री ते हेल्थ पार्क रस्त्यालगत आणि उपरलकर देवस्थानजवळ जागा निश्चित केली आहे. तर मालवाहक वाहनांसाठी आदिनारायण मंगल कार्यालयासमोर, बस स्टॅण्ड श्रीधर अपार्टमेंट समोर पार्किंग व्यवस्था असणार आहे. रिक्षा पार्किंग व्यवस्था गांधी चौक कारंजाभोवती (१५ रिक्षा), जुने न्यायालय इमारत (५ रिक्षा), चर्च बाजूने (५ रिक्षा), जयप्रकाश चौक ते महावितरण कार्यालय, नगरपरिषद गेट ते सुरभी (१०) आणि वृद्धाश्रमाजवळ (५ रिक्षा) अशा विविध ठिकाणी रिक्षांसाठी ठराविक संख्या निश्चित करून जागा देण्यात आली आहे. सहा आसनी रिक्षांसाठी जुना उपरल नाका येथे जागा दिली आहे.

दरम्यान, वन-वे मार्ग म्हणून शहरात 'गांधी चौक ते जनता मेडिकल' आणि 'संचयनी पॅलेस रोड' हे मार्ग वन-वे (एकतर्फी) करण्यात आले आहेत.  सर्व शाळांच्या प्रवेशद्वाराजवळ गतीरोधक बसवणे, मुख्य चौकांत झेब्रा क्रॉसिंग करणे आणि शहरातील सर्व पदपथांवर 'नो पार्किंग' घोषित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर लाईट व्हेईकल करता नो पार्किंग झोन म्हणून काजरेकर दुकान- विठ्ठल मंदिर ते अर्बन बँक तिठा, हॉटेल तारा-चोडणकर दुकान ते बँक ऑफ इंडिया, संचयनी पॅलेस ते शिवप्रसाद लॉज, न.प. बस स्टॉप ते सारस्वत बँक, आरोग्य भवन ते आरपीडी हायस्कूल, उभाबाजार मसूकर ते हळदणकर दुकान, भांगले पेट्रोल पंप ते जयप्रकाश चौक, संचयनी रस्ता, तीन मुस ते नवीन पोस्ट ऑफिस, गांधी चौक ते मिलाग्रीस चर्च, तीन मुस ते पॉम्पस हॉटेल, गोमंतक ते चिताराळी पर्यंत झोन निश्चित करण्यात आला आहे. या बैठकीदरम्यान सुधीर पराडकर, अभय पंडित, राजू मसूरकर, राजू पनवेलकर, रवींद्र प्रभु, सुधीर आरीवडेकर, आनंद नेवगी व सिद्धार्थ भांबुरे आदींनी विविध महत्त्वाच्या सूचना मांडल्या. शहरातील एसटी बस स्थानक २५ मीटर क्षेत्रात नो-पार्किंगची कडक अंमलबजावणी करावी, भाजी विक्रेत्यांमुळे वाहतुकीस अडथळा होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि व्यावसायिक इमारतींच्या मंजूर पार्किंगच्या जागेत दुकाने थाटल्यास कारवाई करावी, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या. यावर बोलताना सभापती प्रतिक बांदेकर यांनी स्पष्ट केले की, ज्या पार्किंगच्या जागेवर दुकाने किंवा इतर अतिक्रमणे केली असतील त्यांच्यावर नगरपालिकेकडून कडक कारवाई केली जाईल.