LIVE UPDATES

५ हजारांची लाच स्वीकारताना सावर्डे येथील मंडळ अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 05, 2026 20:36 PM
views 41  views

चिपळूण : तालुक्यातील सावर्डे येथील मंडळ अधिकारी अनिल जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी (५ ऑगस्ट) दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास रंगेहाथ पकडल्याने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे. या मंडळ अधिकाऱ्याबाबत गेल्या काही महिन्यांपासून सावर्डे पंचक्रोशीत तक्रारींचा सूर होता. या कारवाईने सावर्डे पंचक्रोशीवासियांमधून समाधान व्यक्त केले जात आहे. 

सावर्डे मंडळ अधिकारी म्हणून अनिल जाधव गेल्या काही महिन्यांपासून कारभार पाहत आहेत.  मात्र, जाधव यांच्याबाबत सावर्डे पंचक्रोशीवासियांमधून तक्रारींचा सुरू होता.  यासंदर्भात प्रणय चव्हाण यांनी गेल्या महिनाभरापूर्वी आमदार शेखर निकम यांच्याकडे अनिल जाधव यांच्या कामकाजाबाबत तक्रार देखील केली होती. दरम्यान, बुधवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सावर्डे मंडल अधिकारी अनिल जाधव यांना ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले असल्याचे समोर आले आहे.  

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने खरेदी केलेल्या जमिनीच्या खरेदीखताची नोंद करण्याचे काम गेल्या तब्बल दोन वर्षांपासून प्रलंबित होते. वारंवार पाठपुरावा करूनही काम होत नसल्याने तक्रारदाराला हेलपाटे मारावे लागत होते. अखेर ही नोंद करण्यासाठी मंडळ अधिकारी जाधव याने पाच हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची पडताळणी झाल्यानंतर बुधवारी सापळा रचण्यात आला. त्यामध्ये जाधव याला पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले.

या कारवाईमुळे महसूल विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नागरिकांची कामे महिनोनमहिने प्रलंबित ठेवून पैशांची मागणी केली जात असल्याच्या तक्रारींना या घटनेने पुन्हा एकदा खतपाणी मिळाले आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या नागरिकांना अशा प्रकारे मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागत असल्याने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. एकंदरीत, चिपळूण तालुक्यात गेल्या काही महिन्यात दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच स्वीकारताना पकडल्याचे समोर आले आहे. यामुळे प्रशासकीय कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत.