LIVE UPDATES

शाळेत शिक्षकांच्या मोबाईलला 'ब्रेक'

रत्नागिरीत नवा निर्णय
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 05, 2026 11:49 AM
views 1093  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षकांच्या शालेय वेळेतील मोबाईल वापरावर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, शाळा सुरू असताना केवळ मुख्याध्यापकांनाच प्रशासकीय कामकाजासाठी मोबाईल वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. इतर सर्व शिक्षकांना आपले मोबाईल कपाटात ठेवावे लागणार आहेत.

विद्यार्थ्यांच्या अध्यापनात कोणताही व्यत्यय येऊ नये, शिक्षकांचे लक्ष पूर्णपणे अध्यापनावर केंद्रित राहावे आणि शाळांमधील शैक्षणिक वातावरण अधिक सक्षम व्हावे, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. या आदेशाची अंमलबजावणी जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये तातडीने करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

या निर्णयाचे पालकांकडून स्वागत करण्यात आले असून, त्यामुळे वर्गातील अध्यापनाची गुणवत्ता सुधारण्यास आणि शालेय शिस्त अधिक बळकट होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

दुसरीकडे, शिक्षकांनी या निर्णयाबाबत संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. शासनाकडून विविध ऑनलाइन नोंदी, उपस्थिती, शैक्षणिक अहवाल, ॲपद्वारे माहिती भरणे तसेच विविध पोर्टलवरील कामांसाठी मोबाईलचा वापर आवश्यक असल्याने, या निर्बंधामुळे ऑनलाइन प्रशासकीय कामकाजात अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चिंता शिक्षकांनी व्यक्त केली आहे.