LIVE UPDATES

आंबोलीत पर्यटकाचा मृत्यू, मृतदेह सापडला

सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीमच्या सहाय्याने मृतदेह वर काढण्याची प्रक्रिया सुरू
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: August 05, 2026 11:36 AM
views 1084  views
#kokansadlive#news update#konkan update# breaking news#

सावंतवाडी : निपाणी येथील एका पर्यटकाचा महादेवगड पॉईंटवरून सुमारे ४०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली होती. डॉ. आयुब सय्यद (वय ४५, रा. जत्राट, निपाणी, जि. बेळगाव) असे दरीत कोसळलेल्या पर्यटकाचे नाव होते. आज पहाटेपासून पुन्हा एकदा सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम आंबोली, सांगेलीकडून शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी संबंधितांचा मृतदेह आढळून आला असून रेस्कू टीमच्या मदतीने मृतदेह वर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 डॉ. आयुब सय्यद हे आपल्या नऊ सहकाऱ्यांसोबत मंगळवारी सकाळी आंबोली येथे वर्षा पर्यटनासाठी आले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास महादेवगड पॉईंट परिसरात असताना ते लघुशंकेसाठी दरीच्या बाजूला असलेल्या सुरक्षेच्या रेलिंगवरून पलीकडे गेले. या दरम्यान अचानक तोल गेल्याने ते थेट ४०० फूट खोल दरीत कोसळले. महादेवगड पॉईंटवर मक्याची कणसे विकणाऱ्या एका स्थानिक विक्रेत्याने त्यांना दरीत कोसळताना पाहिले आणि तात्काळ त्यांच्या सहकाऱ्यांना या अपघाताची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच सावंतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंबोलीतील 'सह्याद्री ॲडव्हेंचर रेस्क्यू टीम'ला मदतीसाठी पाचारण केले. रेस्क्यू टीम आणि पोलिसांनी तात्काळ शोधमोहीम हाती घेतली होती. मात्र, परिसरात सुरू असणारा संततधार पाऊस, दाट धुके आणि अंधारामुळे सायंकाळी सात वाजेच्या सुमारास ही शोधमोहीम तात्पुरती थांबवावी लागली होती. मंगळवारी सायंकाळी थांबवण्यात आलेली रेस्क्यू मोहीम बुधवारी सकाळी पहाटे पुन्हा सुरू करण्यात आली. त्यानंतर दहाच्या सुमारास मृतदेह खोल दरीत आढळून आला. सद्य स्थितीत हा मृतदेह दरीतून वर काढण्याची प्रक्रिया सुरू आहे.