
सिंधुदुर्गनगरी : फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीअंतर्गत न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट येथील शिक्षक अजितकुमार विष्णू देठे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार न्याय मिळावा आणि मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव नियमानुसार सादर करण्यात यावा, या मागणीसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना व विविध सामाजिक संघटनांच्या वतीने सुरू करण्यात आलेले बेमुदत धरणे आंदोलन शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्या लेखी पत्रानंतर स्थगित करण्यात आले आहे. या घडामोडीमुळे अजितकुमार देठे यांच्या न्यायाच्या लढ्याला महत्त्वपूर्ण दिशा मिळाली आहे.
२६ ऑक्टोबर २०२६ रोजी आंदोलनस्थळी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदेश किंजवडेकर यांनी भेट देऊन आंदोलनकर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. या वेळी कास्ट्राईब शिक्षक संघटना, कर्मचारी संघटना तसेच विविध सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींनी अजितकुमार विष्णू देठे यांच्या सेवा ज्येष्ठतेचा प्रश्न आणि मुख्याध्यापक पदाच्या प्रस्तावाबाबतची भूमिका सविस्तर मांडली. संबंधित प्रकरणात यापूर्वी झालेल्या सुनावण्या, शिक्षण विभागाने संस्थेला पाठविलेली पत्रे आणि त्यानुसार होणे अपेक्षित असलेली कार्यवाही यावर चर्चा झाली.
शिक्षणाधिकाऱ्यांचे संस्थेला लेखी निर्देश
या चर्चेनंतर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) संदेश किंजवडेकर यांनी २६ ऑक्टोबर २०२६ रोजी पत्र क्र. जा.क्र. सिजिप/शिक्षण/माध्य/आस्था-४/१९५७/२०२६ अन्वये आंदोलन स्थगित करण्याबाबतचे पत्र कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष संदीप लहु कदम यांना दिले. या पत्रात आंदोलनस्थळी झालेल्या चर्चेचा उल्लेख करून, फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांची आणि संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची संबंधित विषयावर संयुक्त बैठक आयोजित करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच, आंदोलन स्थगित करून प्रशासनाला सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे.
त्याच दिवशी शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांनी फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष/सचिव आणि न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाटच्या मुख्याध्यापकांना पत्र क्र. जा.क्र. सिजिप/माध्य/आ-४/१९५८/२०२६ द्वारे मुख्याध्यापक पदाच्या प्रस्तावाबाबत लेखी निर्देश दिले.
या पत्रात ५ जुलै २०२३, २० नोव्हेंबर २०२३, १५ ऑक्टोबर २०२४, २७ डिसेंबर २०२४, ३ जून २०२६ आणि २८ ऑगस्ट २०२६ रोजीच्या पूर्वीच्या पत्रांचा संदर्भ देण्यात आला आहे. १ मे २०२६ ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शालेय कामकाजात अडचण निर्माण होऊ नये म्हणून प्रभारी मुख्याध्यापक मान्यता देण्यात आली होती. सदर नियुक्तीचा कालावधी ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत असल्याने त्यानंतर मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव सादर करताना कार्यालयाच्या संदर्भित पत्रांनुसार सेवा ज्येष्ठतेप्रमाणे प्रस्ताव सादर करावा, असे या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.
सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नावर पुढील कार्यवाहीची अपेक्षा
शिक्षण विभागाच्या या लेखी पत्रव्यवहारामुळे अजितकुमार विष्णू देठे यांच्या सेवा ज्येष्ठतेच्या प्रश्नावर पुढील प्रशासकीय कार्यवाही करण्याचा मार्ग स्पष्ट झाला आहे. संस्थेने शिक्षण विभागाच्या निर्देशांचा विचार करून सेवा ज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापक पदाचा प्रस्ताव सादर करणे अपेक्षित आहे.
आंदोलनकर्त्यांनी संबंधित शिक्षकाला सेवा ज्येष्ठतेनुसार न्याय मिळावा, प्रशासकीय प्रक्रियेत पारदर्शकता राहावी आणि शिक्षण विभागाच्या पत्रांनुसार कार्यवाही व्हावी, अशी ठाम भूमिका घेतली होती. या मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना व विविध सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे पाठपुरावा केला.
आंदोलन स्थगित; न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहणार
शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्याशी झालेली प्रत्यक्ष चर्चा, संस्थेला देण्यात आलेले लेखी निर्देश आणि पुढील कार्यवाहीबाबत व्यक्त करण्यात आलेली भूमिका लक्षात घेऊन बेमुदत धरणे आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आंदोलन स्थगित झाले असले, तरी हा संघर्ष संपलेला नाही. अजितकुमार विष्णू देठे यांना सेवा ज्येष्ठतेनुसार न्याय मिळावा आणि मुख्याध्यापक पदाच्या प्रस्तावाबाबत नियमानुसार कार्यवाही व्हावी, यासाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना व इतर सामाजिक संघटनांच्या वतीने पुढील पाठपुरावा सुरू ठेवण्यात येणार आहे.
आता फोंडाघाट एज्युकेशन सोसायटी शिक्षण विभागाच्या लेखी निर्देशांनुसार पुढील कार्यवाही कशी करते, याकडे शिक्षकवर्ग, संघटना आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








