
रत्नागिरी : दीपावलीच्या निमित्ताने दिव्यांगांच्या जीवनात प्रकाशमयी वाट तयार करणाऱ्या आविष्कार संस्थेत सध्या विविध प्रकारचे आकाशकंदिल, पणत्या, अगरबत्ती, कापडी पिशव्या, हॅंडमेड साबण बनवण्याची लगबग सुरू आहे. मतिमंद विद्यार्थ्यांच्या जीवनात ही दिवाळी आनंद निर्माण करते आणि या वस्तूंच्या विक्रीतून प्रोत्साहन देते. विद्यार्थ्यांच्या हस्तकौशल्यातून आणि मेहनतीतून साकारलेल्या या वस्तू घेऊन त्यांच्या जिद्दीला बळ द्या, असे आवाहन संस्थेने केले आहे.
आविष्कार संस्थेच्या शामराव भिडे कार्यशाळा व सविता कामत विद्यामंदिरला आज भेट दिली असता विद्यार्थी विविध वस्तू साकात होते. विद्यार्थ्यांनी खास दिवाळीनिमित्त सुंदर भेटवस्तूंचा आकर्षक गिफ्ट बॉक्स बनवला आहे. यामध्ये आकाश कंदील, साबण, कापडी पिशव्या, मेणबत्ती, अगरबत्ती, धूपकाडी, फोटो फ्रेम, आकर्षक विविधरंगी पर्स, करवंटीपासून शो पीस साकारले आहेत.
दिवाळीची चाहूल लागताच आविष्कारमध्ये हस्तकलेतून वस्तू साकारण्यास सुरवात होते. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक प्रशिक्षणाचा एक भाग म्हणून आविष्कार संस्थेत शामराव भिडे कार्यशाळा आणि मीरा लिमये उद्योगकेंद्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करते. या वस्तू निर्मितीतून विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळतात व त्यातून प्रोत्साहन मिळते. विशेष म्हणजे या वस्तूंच्या विक्रीतून होणारा नफा विद्यार्थ्यांना विभागून दिला जातो.

प्रौढ दिव्यांगाना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांना त्यांच्या स्वतःच्या पायावर उभे करून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणून एक उत्पादक घटक बनविण्याकरिता शामराव भिडे कार्यशाळा गेली ३४ वर्षे कार्यरत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक पुनर्वसन करण्यात कार्यशाळेला यश आले आहे. व्यावसायिक पुनर्वसित विद्यार्थी आपल्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा हातभार लावतात. विद्यार्थ्यांना शासकीय मदत मिळवून देऊन त्यांना त्यांच्या स्वयंरोजगाराकरिता अधिक प्रोत्साहित केले जात आहे.
“विद्यार्थी विक्री केंद्राच्या माध्यमातून स्वतः वस्तू निर्मित केलेल्या वस्तू विक्री करीत असतात. त्यामुळे विद्यार्थी प्रोत्साहित होऊन त्यांचे पुढील कौशल्य विकसित होण्यासाठी मोलाची मदत होते. त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची वर्तन समस्या देखील काही अंशी कमी होताना दिसत आहे. प्रशिक्षणाचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना घरी वस्तूनिर्मिती करण्यासाठी साहित्य दिले जाते. याचा उपयोग होतो व पालक व विद्यार्थी एकत्रित हे काम करतात.”
- सचिन वायंगणकर, व्यवस्थापकीय अधीक्षक.
प्रदर्शनातून प्रोत्साहन
दिवाळीनिमित्त आविष्कारमध्ये निर्मित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन १ ते ४ नोव्हेंबर या काळात सायंकाळी ४ ते ९ या वेळेमध्ये स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात आयोजित केले आहे. या केंद्रावर स्वतः तयार केलेल्या वस्तूंची विक्री विद्यार्थीच करणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी रत्नागिरीकरांनी या विक्री केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष बिपीन शाह यांनी केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








