
रत्नागिरी : आयुष्यातील एखादी अनपेक्षित घटना संपूर्ण जीवनप्रवास बदलून टाकते. मात्र, आपुलकीची साथ, योग्य मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास नव्याने आयुष्य जगण्याचा आत्मविश्वास निर्माण होऊ शकतो. गुरुनाथ भिकाजी डोंगळे (वय ३५, रा. मात्तिवडे, ता. निपाणी, जि. बेळगाव) यांचा प्रवास याचे प्रेरणादायी उदाहरण आहे. येथील रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांनी दिलेली निओमोशन गाडीमुळे त्यांच्या जीवनात नवी उमेद निर्माण झाली आहे.
गुरुनाथ हे दहावीनंतर वडिलांना शेतीकामात मदत करत होते. २०१४ मध्ये नीलम यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांना स्वरा आणि राजवीर ही दोन मुले झाली. २०२२ मध्ये आंबे काढण्यासाठी झाडावर चढले असता तोल जाऊन ते खाली पडले. या अपघातात त्यांच्या पाठीच्या मणक्याला गंभीर दुखापत झाली. मानेपासून खालच्या भागाच्या संवेदना गेल्याने त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठे बदल झाले आणि अनेक कामांसाठी त्यांना इतरांच्या मदतीवर अवलंबून राहावे लागले.
या कठीण प्रवासात पत्नी नीलम यांनी त्यांना मोलाची साथ दिली. डॉक्टरांकडून व्यायाम शिकून त्या दररोज तीन वेळा त्यांचा व्यायाम करून घेत होत्या. २०२४ मध्ये हेल्पर्स ऑफ द हॅण्डिकॅप, कोल्हापूर संस्थेच्या सिंधुदुर्ग येथील स्वप्ननगरी प्रकल्पात दोन महिने पुनर्वसनासाठी राहिल्यानंतर गुरुनाथ यांना पहिल्यांदा व्हीलचेअरचा आधार मिळाला. त्यामुळे त्यांना खोलीबाहेर पडणे, लोकांमध्ये मिसळणे आणि स्वतःच्या हाताने जेवणे शक्य झाले. या अनुभवातून त्यांचा आत्मविश्वास वाढला.
स्वप्ननगरी येथे त्यांची ओळख रत्नागिरी हॅंडिकॅप पॅराप्लेजिक फाउंडेशनचे अध्यक्ष सादिक नाकाडे यांच्याशी झाली होती. मग सादिकभाईंनी नेवरे येथील फार्महाऊस येथे आठ दिवस निओमोशन गाडी शिकण्यासाठी बोलावले. तेथे गुरुनाथ यांनी ही गाडी चालवण्यास सुरवात केली. एका दात्याच्या सहकार्याने गोव्यातून आरएचपी फाउंडेशनतर्फे गुरुनाथ यांना निओमोशन इलेक्ट्रॉनिक गाडी उपलब्ध करून देण्यात आली.
कुटुंबाला पुन्हा हातभार
निओमोशनची गाडी मिलाल्याने गुरुनाथ स्वतः घराबाहेर पडतात, गावात फिरतात आणि मित्रांच्या भेटी घेतात. अनेक वर्षांनंतर स्वतःच्या इच्छेने बाहेर जाणे आणि मित्रांमध्ये मिसळणे यांचा आनंद त्यांना अनुभवता येत आहे. या स्वातंत्र्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला असून भविष्यात अर्थार्जन करून कुटुंबाला हातभार लावण्याची त्यांची इच्छा आहे.
“माझ्या या प्रवासात पत्नी नीलमची साथ, सादिक नाकाडे यांचे प्रोत्साहन आणि आरएचपी फाउंडेशनतर्फे मिळालेली मदत महत्त्वाची ठरली आहे. स्वावलंबनाची संधी, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि स्वतःच्या क्षमतेनुसार पुढे जाण्याचे बळ प्रत्येक व्यक्तीला मिळायला हवे. ही संधी मला दिल्याबद्दल याबद्दल फाऊंडेशन व अध्यक्ष सादिकभाई यांचे मनापासून आभार.”
गुरुनाथ डोंगळे
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








