
वेंगुर्ला : कदंब परिवहन महामंडळाच्या (KTCL) ४६ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर २० ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या मार्गांवर नवीन बससेवा सुरू करण्यात आल्या. पणजी ते कोल्हापूर, पणजी ते नरसोबावाडी आणि पणजी ते महाबळेश्वर या मार्गांवरील बससेवांमुळे गोवा आणि महाराष्ट्रातील प्रवाशांना प्रवासाचा नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. विशेषतः सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कासाळ आणि कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना या सेवांचा लाभ होणार आहे.
या नवीन बससेवांचे उद्घाटन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोव्याचे परिवहनमंत्री माविन गुदिन्हो, नावेली मतदारसंघाचे आमदार तथा कदंब परिवहन महामंडळाचे अध्यक्ष उल्हास तुयेकर, महामंडळाचे उपाध्यक्ष, संचालक मंडळाचे सदस्य, व्यवस्थापकीय संचालक रोहन कासकर, महाव्यवस्थापक महेंद्र पेडणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कोल्हापूरसाठी पुशबॅक लक्झरी बस
पणजी ते कोल्हापूर या मार्गावर सावंतवाडी, कणकवली आणि गगनबावडा मार्गे पुशबॅक लक्झरी बससेवा सुरू करण्यात आली आहे. या बसमुळे गोवा आणि सिंधुदुर्गातील प्रवाशांना कोल्हापूरला जाण्यासाठी अधिक आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. ही बस पणजीहून दुपारी १.३० वाजता सुटणार असून पुढे सावंतवाडी दुपारी ३.२०, कुडाळ दुपारी ३.४५, ओरोस सायंकाळी ४.०५, कसाल सायंकाळी ४.२० व कणकवली सायंकाळी ४.५० करत कोल्हापूरला जाणार आहे. तसेच ही बस पुन्हा कोल्हापूरहून १०.४० वाजता परतीच्या प्रवासाला निघणार आहे.
नरसोबावाडीसाठी सेमी लक्झरी बससेवा
धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नरसोबावाडीसाठीही पणजीहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. सावंतवाडी, चंदगड, गडहिंग्लज, निपाणी, कोल्हापूर आणि इचलकरंजी मार्गे ही बस धावणार आहे. वातानुकूलित नसलेल्या या प्रकारातील बससेवेत एअर सस्पेन्शनची सुविधा असल्याने प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा पर्याय मिळणार आहे. ही बस पणजीहून सकाळी ९.०० वाजता सुटून पुढे म्हापसा, पेडणे करत सावंतवाडीला सकाळी ११.४० वाजता पोचणार आहे. यानंतर पुढे चंदगड, गडहिंग्लज, कोल्हापूर, इचलकरंजी करत नरसोबाच्या वाडीला पोचणार आहे. तसेच नरसोबावाडीतून सकाळी ६.०० सुटून कुरुंदवाड, इचलकरंजी, कोल्हापूर, गडहिंग्लज, चंदगड करत परतीचा प्रवास करणार आहे. या सेवेमुळे गोवा आणि सिंधुदुर्गातून नरसोबावाडी येथे धार्मिक दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना प्रवासाचे नियोजन करणे सोयीचे होणार आहे.
महाबळेश्वरसाठीही थेट बससेवा
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वरला जाणाऱ्या प्रवाशांसाठी पणजीहून नवीन बससेवा सुरू करण्यात आली आहे. ही बस सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कसाल, कणकवली, कोल्हापूर, कराड, सातारा, वाई आणि पाचगणी मार्गे महाबळेश्वरकडे जाणार आहे. ही बस पणजीहून सकाळी ८.०० वाजता सुटणार असून सावंतवाडी सकाळी ९.४५, कुडाळ सकाळी १०.००, ओरोस १०.१५, कसाल १०.४०, कणकवली ११.१५ करत कोल्हापूरला दुपारी ३.०० वाजता पोचून पुढील प्रवास करणार आहे. तसेच महाबळेश्वर वरून पुन्हा महाबळेश्वर सकाळी ६.३० वाजता परतीचा प्रवास करणार आहे.
सिंधुदुर्गातील प्रवाशांना प्रवासाचा नवा पर्याय
गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांचे शिक्षण, व्यापार, आरोग्यसेवा, धार्मिक पर्यटन आणि कौटुंबिक कारणांसाठी महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये येणे-जाणे सुरू असते. अशा प्रवाशांसाठी कदंब परिवहन महामंडळाने सुरू केलेल्या या तीन नवीन बससेवा उपयुक्त ठरणार आहेत. विशेषतः सावंतवाडी, कुडाळ, ओरोस, कासाळ आणि कणकवली येथे थांबे उपलब्ध झाल्याने जिल्ह्यातील प्रवाशांना गोव्यातून महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरांपर्यंत जाण्यासाठी आणखी एक पर्याय मिळाला आहे. नरसोबावाडी आणि महाबळेश्वरसारख्या धार्मिक व पर्यटनस्थळांसाठीही या सेवांचा उपयोग होणार आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








