LIVE UPDATES

धार्मिक व सांस्कृतिक स्थळांचा विकास ही सामाजिक जबाबदारी : विशाल परब

आरवलीतील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 18, 2026 11:30 AM
views 20  views

वेंगुर्ले : “आध्यात्मिक क्षेत्र हे समाजाला संस्कार, एकोपा आणि सकारात्मक ऊर्जा देणारे महत्त्वाचे क्षेत्र आहे. मंदिर हे केवळ पूजास्थळ नसून संस्कृती, परंपरा आणि पुढील पिढ्यांना संस्कार देणाऱ्या मूल्यांचे केंद्र आहे. त्यामुळे धार्मिक व सांस्कृतिक स्थळांच्या विकासाला हातभार लावणे ही सामाजिक जबाबदारी आहे,” असे प्रतिपादन युवा नेते विशाल परब यांनी केले.

आरवली-बागकरवाडी येथील काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या नूतन प्रवेशद्वाराच्या बांधकामाचा शुभारंभ विशाल परब यांच्या हस्ते भूमिपूजन करून करण्यात आला. यावेळी ग्रामस्थ आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. नूतन प्रवेशद्वार हे केवळ मंदिरात प्रवेश करण्याचे माध्यम नसून गावच्या श्रद्धा, धार्मिक परंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक ठरेल, असे परब यांनी सांगितले. अनेक पिढ्यांपासून जपल्या गेलेल्या धार्मिक परंपरा आणि देवस्थानांशी असलेली भावनिक नाळ सामाजिक ऐक्य मजबूत करण्यास महत्त्वाची ठरते, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी राजू रगजी, विलास रामचंद्र बागकर, अनिल बागकर, विठोबा बागकर, महेश बागकर, विजय बागकर, प्रसाद बागकर, प्रणय बागकर, राजा बागकर, राजाराम बागकर, शिवराम बागकर, पुरुषोत्तम दीक्षित, भगिरत बागकर, विश्वनाथ बागकर, पंकज नाईक, सुमेश बागकर, उल्हास बागकर, प्रशांत बागकर यांच्यासह ग्रामस्थ व अन्य मान्यवर उपस्थित होते. नूतन प्रवेशद्वाराच्या उभारणीमुळे मंदिर परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच काशीकल्याणी ब्राह्मण मंदिराच्या धार्मिक व सांस्कृतिक वैभवातही भर पडणार असल्याची अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली.