
देवगड : राज्य शासनाने जाहीर केलेली तुटपुंजी मदत अद्यापही बहुतांश नुकसानग्रस्त आंबा व काजू बागायतदारांच्या खात्यात जमा झालेली नाही. गणेशोत्सवापूर्वी बागायतदारांना ही मदत मिळणे गरजेचे होते. देवगड तालुक्यातील सुमारे ७२०० बागायतदारांपैकी जवळपास ६ हजार बागायतदारांनी आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. तरीही हे बागायतदार नुकसानभरपाईपासून वंचित आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने योग्य न्याय द्यावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली.
देवगड येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी आंबा-काजू बागायतदार व व्यापारी संघटनेचे अध्यक्ष काका ढोके, उबाठा युवासेनेचे जिल्हाप्रमुख तथा कणकवली उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, उबाठा युवासेनेचे तालुकाप्रमुख गणेश गावकर, सुजित चौकेकर आदी उपस्थित होते.
देवगड तालुक्यातील बागायतदारांनी सुमारे २२ कोटी रुपये विमा कंपन्यांकडे भरले आहेत. मात्र नुकसानभरपाईपोटी विमा कंपन्यांकडून केवळ २ कोटी ७५ लाख रुपये बागायतदारांना परतावा म्हणून देण्यात आले आहेत. हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला असून, याचा फायदा घेत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
शासनाने नुकसान भरपाईपोटी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांची तुटपुंजी मदत जाहीर केली आहे. ही मदत गणेशोत्सवापूर्वी बागायतदारांना मिळणे आवश्यक होते. मात्र अद्यापही बहुतांश बागायतदार या मदतीपासून वंचित आहेत.फेब्रुवारी महिन्यापासून देवगडमधील आंबा व काजू बागायतदार आपल्या न्याय्य मागण्यांसाठी रस्त्यावर उतरून शासनाकडे न्यायाची अपेक्षा करीत आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी आंदोलनेही केली. या कठीण काळात शेतकऱ्यांना सक्षम करण्याची जबाबदारी शासनाची होती. त्यामुळे त्यांच्या आंदोलनाची दखल घेणे गरजेचे होते, असे राजू शेट्टी यांनी सांगितले.
सांगली-कोल्हापूर पॅटर्न कोकणात का नाही?
२०१९ मध्ये सांगली व कोल्हापूर भागात आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यावेळी शासनाने नुकसानभरपाईच्या निकषांमध्ये बदल करून सरसकट कर्जमाफी दिली होती. हा पॅटर्न कोकणातील शेतकऱ्यांसाठी का लागू करण्यात आला नाही, असा सवाल राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.
देवगड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कर्जाची थकबाकी मोठ्या प्रमाणात नसल्याने शासनाने विशेष बाब म्हणून सरसकट कर्जमाफी देणे गरजेचे होते, अशी मागणी त्यांनी केली.
देवगड तालुक्यात चार हवामान केंद्रे असताना केवळ एका मंडलातील शेतकऱ्यांनाच विमा योजनेचा लाभ मिळाला आहे.
उर्वरित तीन मंडलांतील शेतकरी अद्याप विमा योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. या भागातील शेतकऱ्यांनी विमा कंपन्यांकडे सुमारे २२ कोटी रुपये जमा केले असताना, विमा कंपन्यांनी नुकसानभरपाईपोटी केवळ २ कोटी ७५ लाख रुपये अदा केले आहेत.हवामान केंद्रातील तांत्रिक त्रुटींचा फटका सर्वसामान्य शेतकऱ्यांना बसला असून, त्याचा फायदा विमा कंपन्यांनी घेत शेतकऱ्यांची फसवणूक केली, असा आरोपही राजू शेट्टी यांनी केला.
भांडवली उद्योगांपेक्षा शेतीकडेही लक्ष द्या
भांडवली उद्योगांमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे. एआय तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला जात आहे. मात्र शेतकऱ्यांकडेही शासनाने लक्ष देणे गरजेचे आहे. भांडवली उद्योगांमुळे किती प्रमाणात रोजगारनिर्मिती झाली, याची श्वेतपत्रिका शासनाने काढावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.
कोट्यवधी रुपयांचे प्रकल्प जाहीर करून त्यांचा डीपीआर वाढवायचा आणि मोठे कमिशन घ्यायचे, असे काम सत्ताधाऱ्यांकडून सध्या सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. शासनाने कृषी पर्यटनाला चालना द्यावी, पारंपरिक उद्योगांना प्रोत्साहन द्यावे; मात्र अणुऊर्जेसारखे विनाशकारी प्रकल्प कोकणात आणू नयेत. त्याला आमचा कायम विरोध राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.
प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाचा एमओयू रद्द झाल्याचे शासनाने जाहीर करावे, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांचे अभिनंदन करण्याचा टोला राजू शेट्टी यांनी लगावला.
कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याचा आरोप
“आमचा कोणताही कार्यकर्ता जातीयवादी नाही. तरीही आमच्या कार्यकर्त्यांना खोट्या व नाहक गुन्ह्यांमध्ये अडकविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे,” असा आरोप राजू शेट्टी यांनी केला.
देवगड येथील गणेश गावकर यांच्यावर खोटा अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच वेंगुर्ल्यातील एका कार्यकर्त्याला ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला. संबंधित कार्यकर्त्याच्या घरात ड्रग्जची पाकिटे पोलिसांनीच ठेवली असावीत, असा संशय त्यांनी व्यक्त केला.
या प्रकरणातील ड्रग्ज पॅडल पोलिसांनी का शोधला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. निर्दोष माणसांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यासाठी पोलिस अधिकाऱ्यांनीच जोडधंदा सुरू केला नाही ना, अशी शंका व्यक्त करत, “ज्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्यात येईल, त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू,” असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.
“सिंधुदुर्गचा बिहार झाला आहे की काय?” असा सवाल उपस्थित करत त्यांनी भविष्यात विरोधक सत्तेत आल्यास सत्ताधाऱ्यांची एकही कंबर शिल्लक राहणार नाही, असा इशाराही दिला.
यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनातील लढवय्या कार्यकर्ता म्हणून गणेश गावकर यांचा राजू शेट्टी यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.










