LIVE UPDATES

Ganeshotsav 2026 Sindhudurg : चाकरमानी आले....घर-आंगण उजळले...

मुंबईसह विविध शहरांतून गणेशोत्सवासाठी कोकणात दाखल झालेल्या चाकरमान्यांमुळे कोकणातील बाजारपेठांना पुन्हा एकदा उत्साहाचे रूप आले आहे. प्रवासात अनेक अडचणींचा सामना करत, मिळेल त्या वाहनाने कशीबशी वाट काढत चाकरमानी अखेर आपल्या गावात पोहोचले. गणरायाच्या आगमनाचा आनंद मनात घेऊन गाव गाठल्यानंतर अनेकांनी थेट बाजारपेठेकडे धाव घेतली.
Edited by: लक्ष्‍मण आडाव
Published on: September 18, 2026 11:54 AM
views 17  views

सिंधुदुर्ग : यंदाचा गणेशोत्सव १२ दिवसांचा असून १२व्या दिवशी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे यंदा बाप्पांचा मुक्कामही वाढला आहे. बाप्पा अधिक दिवस भक्तांच्या घरी विराजमान राहणार असल्याने, भक्तांचा उत्साह आणि गणेशोत्सवाची लगबगही अधिक वाढली आहे.

गणेशोत्सवासाठी आवश्यक साहित्य, सजावटीच्या वस्तू, फुले, फळे तसेच घरगुती खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी झाली होती. चाकरमान्यांच्या आगमनामुळे अनेक ठिकाणी बाजारपेठा तुडुंब भरलेल्या दिसून आल्या. त्यामुळे व्यापारी आणि दुकानदारांची प्रतीक्षा संपली असून त्यांच्या व्यवसायालाही चांगली चालना मिळत असल्‍याचे दिसून आले.

बाजारपेठेतील वाढलेल्या गर्दीचा फायदा रिक्षाचालकांनाही होत असून प्रवासी वाहतुकीत वाढ झाली आहे. चाकरमान्यांच्या आगमनामुळे कोकणातील वातावरणात गणेशोत्सवाची खरी लगबग आणि उत्साह आता जाणवू लागला आहे.

गणेशोत्सवाला मुंबई, पुणे आणि अन्य शहरांतून चाकरमानी आपल्या मूळ गावी दाखल झाले. 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात कोकण रेल्वेच्या गाड्या आणि विशेष एसटी बसेस सिंधुदुर्गाच्या मातीत दाखल झाल्या. या आगमनाने महिनोनमहिने बंद असलेली गावोगावातील घरे उघडली असून, संपूर्ण तळकोकणात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण पसरले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांत लाखो चाकरमानी सिंधुदुर्गात पोहोचले आहेत. 

कोकणात गणेशोत्सवाचा आनंद हा केवळ सणाचा नसून तो माणसांच्या एकत्र येण्याचा एक मोठा उत्सव असतो. वर्षभर कामानिमित्ताने बाहेरगावी राहिलेली मने या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या मातीशी जोडली जातात. लहान किलबिलाटाने मुलांच्या आणि ज्येष्ठांच्या आशीर्वादाने प्रत्येक घरातील कळा पालटून जाते.

रेल्वे आणि बसस्थानकांवर लागणाऱ्या गर्दीतून कोकणावर असलेले बाप्पाचे अफाट प्रेम स्पष्टपणे दिसून येते. प्रशासनाने केलेल्या विशेष गाड्यांच्या नियोजनामुळे प्रवाशांचा प्रवास सुकर झाला असून, अवघा सिंधुदुर्ग जिल्हा आता पूर्णपणे भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात न्हाऊन निघाला आहे.

गणेशोत्सवाच्या काळात जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिस प्रशासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. रेल्वे स्थानके, एसटी स्थानक तसेच प्रमुख जंक्शनवर अतिरिक्त पोलिस फाटा तैनात करण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्गावर गतिरोधक, दिशादर्शक फलक असल्याने भक्तांचा प्रवास सुरळीत पार पडत आहे. कोकण रेल्वेने हजारो चाकरमानी दाखल झाल्याने कणकवली रेल्वे स्थानकावर प्रचंड गर्दी झाली होती. कणकवली बाजारपेठेत शनिवारी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.

एसटी महामंडळाच्या १४५० विशेष बसेस

मुंबई, ठाणे आणि परिसरातून कोकणात येणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी प्रशासनाने सुमारे १४५० विशेष बसेसची व्यवस्था केली आहे. या गाड्या भक्तांना घेऊन जिल्ह्यातील प्रत्येक गावात दाखल होत असून, सर्व बसेसचे आरक्षण पूर्ण झाले आहे.

विशेष गाड्यांचे नियोजन

गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा सुमारे ३५० विशेष रेल्वेगाड्यांचे नियोजन केले आहे. नियमित गाड्यांसह या सर्व विशेष गाड्यांचे आरक्षण फुल्ल झाले असून, हातात साहित्याच्या बॅगा आणि मनात बाप्पाच्या दर्शनाची ओढ घेऊन चाकरमानी रेल्वेने कोकणात उतरत आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानके गर्दीने फुलून जात आहेत.

रेल्वे आणि बसस्थानकांवर तुडुंब गर्दी

लोकांच्या अलोट गर्दीमुळे सिंधुदुर्गातील सर्व प्रमुख रेल्वे आणि बसस्थानके गजबजून गेली आहेत. या प्रवाशांच्या गर्दीमुळे स्थानक परिसरातील टपऱ्या, खानावळी आणि स्थानिक रिक्षा व्यावसायिकांना यंदा चांगला रोजगार मिळाला असून सुगीचे दिवस आले आहेत.

लेख : लक्ष्‍मण आडाव