LIVE UPDATES

बापर्डेत ‘सेवा संकल्प अभियानाचा’ शुभारंभ

ग्रामस्तरावर शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यासह लोकसहभाग वाढविण्यावर भर
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 18:18 PM
views 28  views
#kokansadlive#news update#konkan update#

देवगड: पंचायत समिती देवगड व ग्रामपंचायत बापर्डे यांच्या संयुक्त विद्यमाने बापर्डे येथे ‘सेवा संकल्प अभियानाचा’ तालुकास्तरीय शुभारंभ पंचायत समिती देवगडचे सभापती गणेश राणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

यावेळी गटविकास अधिकारी निलेश जगताप, बापर्डेचे सरपंच संजय लाड, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर, तालुका व्यवस्थापक हेमंत हळदणकर, ग्राममहसूल अधिकारी प्रविण वळंजु, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र वेद्रुक, पोलीस पाटील नितीन नाईकधुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात सभापती गणेश राणे, गटविकास अधिकारी निलेश जगताप व सरपंच संजय लाड यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. सेवा संकल्प अभियानाचा उद्देश स्पष्ट करताना नागरिकांनी विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देणे, लोकसहभाग वाढविणे, ग्रामस्तरावर लोकाभिमुख उपक्रम राबविणे तसेच विकासकामांना गती देणे, ही प्रमुख उद्दिष्टे आहेत.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायतींच्या सर्वांगीण विकासासाठी निश्चित करण्यात आलेल्या विविध बाबींच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सेवा संकल्प अभियानाचा कालावधी विशेष कृती कालावधी म्हणून उपयोगात आणण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विविध लोकाभिमुख व सेवाभावी उपक्रम राबवून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ अधिक सुलभतेने मिळवून देण्यावर यामध्ये भर दिला जाणार आहे.

देवगड तालुक्यातील सर्व ७२ ग्रामपंचायतींमध्ये सेवा संकल्प अभियान राबविण्याचे नियोजन गटविकास अधिकारी निलेश जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. या उपक्रमाचा तालुकास्तरीय शुभारंभ बापर्डे येथे करण्यात आला.

कार्यक्रमाची प्रस्तावना व सूत्रसंचालन ग्रामपंचायत विस्तार अधिकारी दीपक तेंडुलकर यांनी केले, तर आभार बापर्डेचे सरपंच संजय लाड यांनी मानले.