
सिंधुदुर्ग : गणरायाच्या आगमनाने केवळ घराघरांत मंगलमय वातावरण निर्माण झालेले नाही, तर कोकणातील गावच्या वाड्या-वाड्यांनाही जणू पुन्हा एकदा जीव आला आहे. टिपिकल कौलारू घरे, पाणंदी, पाणवठे आणि बाजारपेठा चाकरमान्यांच्या लगबगीने गजबजल्या आहेत.
वर्षभर मुंबई-पुण्यासह विविध शहरांत राहणारी माणसं बाप्पाच्या निमित्ताने पुन्हा आपल्या मातीशी जोडली गेली आहेत. दुराव्याची अंतरं मिटली, आप्तेष्ट पुन्हा एकत्र आले आणि ‘बाप्पाच्या सेवेसाठी’ प्रत्येक घर सज्ज झाले.
गणेशोत्सवाच्या पहिल्याच दिवसापासून गावोगावी पूजा, सत्यनारायण, भजन, फुगड्या आणि विविध पारंपरिक कार्यक्रमांची लगबग सुरू झाली आहे. रजा कमी असली तरी ‘बाप्पासाठी चार दिवस तरी गावाकडे यायचंच’ या भावनेने चाकरमानी धावपळ करत आहेत. बाजारपेठांमध्ये ओवशाचे साहित्य, भाजीपाला, मिठाई आणि खवय्यांची गर्दी वाढली असून, सकाळच्या वेळेत पेठा माणसांनी फुलून जात आहेत.
गणेशोत्सवातील भक्तिमय वातावरणात स्थानिक भजन मंडळांना विशेष मागणी आहे. सुप्रसिद्ध वारकरी गायक-वादक यांच्या भक्तीगीत, भावगीत, अभंग, भजन आणि गजर पंचक्रोशीत रसिकांच्या पसंतीस उतरले आहेत. महाराष्ट्रामध्ये निसर्ग रम्य सुंदर ते कोकण... या गजराने सध्या सिंधुदुर्गासह संपूर्ण कोकणची माती दुमदुमून गेली आहे. वाडी-वाड्यांतील घराघरांत बाप्पाच्या आरतीचे सूर घुमत आहेत, भजनांनी वातावरण भक्तिमय झाले आहे आणि चाकरमान्यांच्या आगमनाने गावांना पुन्हा एकदा जीव आला आहे.
आजच्या बदलत्या काळात अनेक पारंपरिक लोककला लोप पावत असताना भजन मंडळांच्या कार्यक्रमांना मिळणारा प्रतिसाद आश्वासक चित्र निर्माण करत आहे. विशेष म्हणजे अबालवृद्धांसोबतच तरुणाई आणि ‘जेन-झी’ पिढीही भजनाच्या कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित राहत आहे.
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगातही भजनाचे सूर तरुणांच्या मनापर्यंत पोहोचत आहेत, ही कोकणच्या लोककला आणि परंपरेसाठी निश्चितच सुखद बाब आहे. बदलत्या काळानुसार या परंपरांना सोशल मीडियाची नवी रूपं मिळत असली, तरी त्यामागची मातीशी जोडलेली भावना, भक्ती आणि आपुलकी आजही तितकीच जिवंत आहे.
ताजी बातमी
View all












