
देवगड : राष्ट्रीय किनारा अभियानांतर्गत कुणकेश्वर समुद्रकिनारी शनिवार, १९ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली आहे.मा.जिल्हाधिकारी महोदय यांच्या आदेशान्वये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, या मोहिमेत जिल्हास्तरीय अधिकारी व पदाधिकारी सहभागी होणार आहेत.
कुणकेश्वर समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्याच्या उद्देशाने आयोजित या स्वच्छता मोहिमेत समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक,कचरा, घाण व इतर अनावश्यक वस्तूंची साफसफाई करण्यात येणार आहे.नागरिकांमध्ये स्वच्छता व पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती करण्यासह स्वच्छ किनारा राखण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात येणार आहे.
या मोहिमेस मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जयप्रकाश परब, गटविकास अधिकारी निलेश जगताप, तहसीलदार देवगड, जिल्हा समन्वयक स्वच्छ भारत मिशन अजिंक्य सावंत,तसेच देवगड पंचायत समितीचे सभापती, उपसभापती आणि जिल्हा परिषद सदस्य भाई पारकर उपस्थित राहणार आहेत.
कुणकेश्वर ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील ग्रामस्थ, महिला, युवक-युवती, बचत गट, विविध मंडळे तसेच लोकप्रतिनिधींनी या स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ‘स्वच्छ कुणकेश्वर – सुंदर कुणकेश्वर’ आणि ‘स्वच्छ किनारा, निरोगी पर्यावरण’ या संदेशातून किनारा स्वच्छ ठेवण्याचा संकल्प या मोहिमेत करण्यात येणार आहे.










