
आज वैज्ञानिक प्रगती वेगाने होत असल्याचे आपण अनुभवत आहोत. या आधुनिक जगात या सार्वजनिक गणेशोत्सवाचे महत्व कमी झालेले नाही हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आधुनिकतेच्या आणि भौतिकवादाच्या नावाखाली आपण आपली राष्ट्रीय आणि सांस्कृतिक परंपरा बाजूला सारून सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणे आत्मघात ठरेल.
लोकमान्य टिळकांनी वर्ष १९०५ मध्ये वंगभंगाच्या निमित्ताने चतु:सूत्री कार्यक्रम राबवला. यात स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार आणि राष्ट्रीय शिक्षण यांचा समावेश होता. सांप्रतकाळात नागरिक शिष्टाचार, स्वजागरण, कुटुंब प्रबोधन, समरसता आणि पर्यावरणाचे संरक्षण हा पंचसूत्री कार्यक्रम आपण सार्वजनिक गणेशोत्सवात राबवू शकतो.
आज आपल्या देशातील परिस्थिती पाहता वर उल्लेखलेल्या पाच सूत्रांचा आपण गांभीर्याने विचार करणे नितांत आवश्यक आहे.
१. नागरिक शिष्टाचार
आपण भारताचे नागरिक आहोत. आपल्याला आपल्या देशाचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य टिकवण्यासाठी काही शिष्टाचार काटेकोरपणे पाळावेच लागतील. आज देशात मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनतेचा बुद्धिभेद करून राष्ट्र घातक प्रवृत्तीचा प्रचार आणि प्रसार करणारे काही गट कार्यरत झाले आहेत. राष्ट्रहिताला बाधक ठरणारी कोणतीही कृती आपल्या हातून घडणार नाही याची दखल भारतातल्या प्रत्येक नागरिकाने घेतली पाहिजे.
आपल्या हातून आपल्या राष्ट्रपुरुषांचा, सामाजिक कार्यकर्त्यांचा, सैनिकांचा , राष्ट्राच्या धार्मिक सांस्कृतिक, ऐतिहासिक परंपरांचा, राष्ट्रगीतांचा यथोचित सन्मान बाळगणे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे. हे राष्ट्रीय कर्तव्य म्हणजेच नागरिक शिष्टाचार होय. देशाच्या सर्व नियमांचे, निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करणे देशाचे नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे. याची जाणीव करून देणे, सार्वजनिक गणेशोत्सवात आपल्याला शक्य होणार आहे.
जाती-जातीत, प्रांता-प्रांतात भेद निर्माण करणाऱ्या गटांना शह देण्यासाठी संपूर्ण हिंदू बांधवांना संघटित करून राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याचा आपला हेतू आपल्याला साध्य करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव एक उत्तम माध्यम ठरणार आहे. शाळा, महाशाळेतील विद्यार्थ्यांवर नागरी शिष्टाचाराचे संस्कारही आपल्याला करता येतील.
२. स्वजागरण
आपल्याला आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटनांकडे सजकतेने पाहण्याची सवय जडवली पाहिजे. अखंड सावध राहून आपण समाजात वावरले पाहिजे. तसेच कोणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना बळी न पडता आपण आपल्या राष्ट्राशी एकनिष्ठ राहण्याचा संकल्प केला पाहिजे.
विविध प्रकारचे आमिष दाखवून राष्ट्राला घातक ठरणारे कृत्य करण्यासाठी जर आपल्याला कोणी प्रेरित केले तर त्याला स्पष्ट शब्दात नकार देता आला पाहिजे. त्यासाठी आपल्या दैदीप्यमान इतिहासाचा अभ्यास जागरूकतेने करणे आवश्यक आहे. तसेच आपल्याला शत्रुबोध झाला पाहिजे. म्हणजे आपल्या देशाचा नेमका शत्रू कोण ते आपल्याला ओळखता आले पाहिजे. त्यासाठी सजग असणे क्रमप्राप्त आहे. असे मार्गदर्शन या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या प्रसंगी आपल्याला करता येईल.
३. कुटुंब प्रबोधन
सर्व कुटुंबाला राष्ट्रकार्यासाठी प्रेरित करायचे आहे. लव्ह जिहाद सारख्या घटना आजही आपल्या देशात घडत आहेत. त्यात अनेक हिंदू तरुणीचा बळी जात आहे. हे लक्षात घेऊन त्यांचे प्रबोधन करणे नितांत आवश्यक. तसेच आपण कितीही आधुनिक जगात राहत असलो तरी सुद्धा सभ्यतेच्या कोणत्याही मर्यादांचे उल्लंघन सार्वजनिक आणि वैयक्तिक जीवनात आपल्याकडून होणार नाही यासाठी कुटुंबाचे प्रबोधन करणे काळाची गरज आहे.
आपली वेशभूषा, आपले आचार, विचार, आपल्या संस्कृतीच्या मर्यादेत राहूनच आपल्याकडून घडले पाहिजेत. तसेच आपल्या संविधानाने घालून दिलेली मर्यादा आणि निर्बंधांनी घालून दिलेली मर्यादा आपल्याला ओलांडून चालणार नाही. याची जाणीव संपूर्ण कुटुंबाला होणे राष्ट्रहिताच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
४. समरसता
आपल्या देशात अनेक पंथ, अनेक प्रांत आणि अनेक जाती आहेत. या सर्वांमध्ये दुरावा निर्माण होणे म्हणजे देशाच्या विभाजनाला आणि अराजकतेला दिलेले आमंत्रण आहे. हिंदू समाज म्हणून संघटित होण्यासाठी आणि राष्ट्र बलवान करण्यासाठी जात, पात, पंथ, प्रांत याचा विचार न करता आपण सारे बांधव आहोत ही भावना मनात धारण करून सर्व भेदभाव विसरून भारत मातेचे सुपुत्र या भावनेने संघटित होणे हेच आपल्या सर्वांच्या हिताचे आहे.
आपल्या सर्वांची श्रद्धास्थाने, सर्वांचा इतिहास, सर्वांचे ऐतिहासिक पुरुष संत, महात्मे, देव, देवी, देवता एकच आहेत. हे लक्षात घेऊन आपण बंधू भावनेने या देशात वावरले पाहिजे. तरच आपला देश बलवान होईल आणि देशाचे राष्ट्रीय ऐक्य टिकून राहील.
५. पर्यावरण संरक्षण
आपली संस्कृती सृष्टी आपली माता आहे, अशी शिकवण देणारी आहे. या सृष्टीने आपल्याला अनेक गोष्टी विनामूल्य बहाल केल्या आहेत. त्यांचे संरक्षण करणे आपले कर्तव्य आहे. सृष्टीची पर्यायाने पर्यावरणाची हानी करून आपण सुखाने जीवन जगू शकत नाही. म्हणूनच निसर्गाच्या नियमांचे म्हणजेच सृष्टीच्या नियमांचे आपण काटेकोरपणे पालन करणे आपल्या हिताचे ठरणार आहे.
विज्ञानाची प्रगती होत आहे त्याचा विपरीत परिणाम सृष्टीवर होत आहे. परिणामी भूमि, वायू, पाणी, ध्वनी यांचे प्रदूषण होत आहे. हे प्रदूषण आपल्यासाठी घातक आहे. ही सृष्टी आपले पोषण करते म्हणून तिचे आपल्याला शोषण करता येणार नाही हा विचार आपल्याला आपल्या समाजात रुजवावा लागेल. त्यासाठी आपणच पुढाकार घेतला पाहिजे.
गृहस्थाश्रम हा धार्मिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनाचा आधारस्तंभ
गणेशोत्सवात सर्वांनी पारंपारिक वेशभूषा करणे अगत्याचे आहे. आपण कितीही आधुनिक जगात वावरत असलो तरी आपली संस्कृती परंपरा जतन करण्याचे दायित्व आपलेच आहे. ऋषीमुनींनी, संतमहात्म्यांनी आपल्या संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. या संस्कृतीच्या आणि धर्माच्या रक्षणार्थ परमेश्वर अवतार घेऊन भूतलावर येतो. अशा आपल्या श्रेष्ठतम धर्म आणि संस्कृतीच्या बाबतीत उदासीनता बाळगणे आणि परंपरेला डावलून उत्सव साजरे करणे हा आपला अक्षम्य असा अपराध आहे, हे पाप आहे. हे लक्षात घेऊन या उत्सवात उत्साहाने सहभागी व्हावे. यासाठी माता-पित्यांनी पुढाकार घ्यावा.
मुला बाळांवर संस्कार करण्याचे काम पिढ्यानपिढ्या माता-पिताच करत आले आहेत. कोणत्याही धार्मिक कार्यात, सांस्कृतिक कार्यात पती-पत्नी यांचा जोडीने सहभाग असतो. सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी पती-पत्नी दोघेही जोडीने बसतात. मौंजीबधन, विवाह संस्कार या आणि अशा संस्कार कार्यातही कुटुंबातील पुरुष आणि स्त्रिया यांचा समान सहभाग असतो.
विशेषता माता पिता यांचा. वैदिक संस्कृतीने स्त्री-पुरुष असा भेद कोठेही केलेला नाही. गृहस्थाश्रम हा धार्मिक, सांस्कृतिक आणि राष्ट्रीय जीवनाचा आधारस्तंभ आहे. असे आपल्या अथर्ववेदाने स्पष्ट शब्दात म्हटले आहे. म्हणूनच वर्ण चार वर्णाश्रमामध्ये गृहस्थाश्रम हा सर्वात श्रेष्ठ मानला गेला आहे.
आपण सारे गृहस्थाश्रमी आहोत हे लक्षात घेऊन सर्व प्रकारच्या सण उत्साहात आपल्याकडून कळत नकळत सुद्धा कोणताही अपराध घडू नये याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. हे संस्कार उगवत्या पिढीवर आपल्याला करायचे आहेत. त्याचे भान प्रत्येक परिवाराने ठेवले पाहिजे. तरच आपली सांस्कृतिक परंपरा आणि धार्मिक परंपरा अबाधित राहतील.
राष्ट्राच्या जडणघडणीचे दायित्व विशेषतः तरुण तरुणींवर सर्वाअधिक आहे. तरुण-तरुणींनी आपल्या चरितार्थाचा विचार अवश्य करावा. तो करताना आपल्या राष्ट्राला विसरायचे नाही. भारतमाता ही आपल्या सर्वांची माता आहे. तिच्या सुरक्षिततेत आणि तिच्या समृद्धीतच आपली सुरक्षितता आणि समृद्धी दडली आहे. याची जाणीव ठेवून आपले राष्ट्रीय दायित्व आपल्याला बजावावे लागणार आहे.
आजचे तरुण आणि तरुणी हुशार आणि कर्तबगार आहेत. आधुनिक विज्ञानाचा, तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या देशाची वैज्ञानिक, धार्मिक, सांस्कृतिक उज्वल परंपरा जतन करण्यासाठी पराकाष्ठेचा प्रयत्न केला पाहिजे. किंबहुना तेच आपले ध्येय म्हणून स्वीकारले पाहिजे.
सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने आपल्यावरील दायित्वाची दखल घेऊन संघटित होण्यासाठी मिळालेली संधी या देशाचे नागरिक म्हणून आपण दवडता कामा नये.
स्त्री, पुरुष हा नैसर्गिक रित्या असलेला शारीरिक भेद आहे. हे लक्षात घेतले पाहिजे. निसर्गाने घालून दिलेली ही मर्यादा न ओलांडता माणूस म्हणून परस्परांकडे समदृष्टीने पाहिले पाहिजे. तशी शिकवण तसे संस्कार करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सव हे उत्तम माध्यम ठरू शकते. समदृष्टीने पाहणे आणि समवर्तन करणे यात महद अंतर आहे. परस्त्री ही मातेसमान असते. स्त्री जातीचा मान राखणे हे सभ्यतेचे लक्षण आहे सुसंस्कृतपणाचे लक्षण आहे. या सभ्यतेकडे आणि सुसंस्कृतपणाकडे पाठ फिरवता येत नाही. ही शिकवण कितीही भौतिक प्रगती झाली तरीही कालबाह्य ठरत नाही.
सार्वजनिक गणेशोत्सवच नाही तर सर्वच उत्सव साजरे करताना या सर्व मर्यादांचे आपण काटेकोरपणे पालन केले पाहिजे. हे उत्सव आहेत ते सुसंस्कृतपणेच साजरे करायचे आहेत. उन्मादाने किंवा उन्मत्तपणाने साजरे करायचे नाहीत. सात्विकता सुसंस्कृत समाजाचा गुण आहे. या सात्विकतेच्या मर्यादेतच राहून जगाच्या पाठीवर कुठेही आपण गेलो तरी सभ्यता, सुजाणपणा टाकता येणार नाही. याची जाणीव प्रत्येक पिढीत निर्माण करण्यासाठी आपल्याला अपार कष्ट घ्यावे लागणार आहेत.
थोडक्यात आपण घडायचे आहे आणि इतरांनाही घडवायचे आहे. संपूर्ण मानवी समाज सुविद्य, सुसंस्कृत करण्याचे आपले जीवन ध्येय आहे. या ध्येय मार्गावरून वाटचाल करताना श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्याच पदपथावरून वाटचाल करायची आहे. याचे स्मरण हाच सर्वात मोठा संस्कार आहे. तो गणेशोत्सवाच्या निमित्ताने जनमानसावर ठसवण्याची संधी आपण दवडायची नाही. अशा शुभ कार्याचा शुभारंभ आपण करण्यास कटिबद्ध होऊया.
लेखक- दुर्गेश जयवंत परुळकर
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all










