LIVE UPDATES

अवैध बॉटलिंग कारखाना उध्वस्त

१ कोटींचा मुद्देमाल जप्त
Edited by: कोकणसाद Live न्यूज नेटवर्क
Published on: September 17, 2026 19:51 PM
views 29  views
Kokansad Live # sindhudurg news #breaking news

रत्नागिरी: रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग राज्य उत्पादन शुल्क (एक्साईज) भरारी पथकाने राजापूर तालुक्यातील तळगाव येथे संयुक्त कारवाई करत परराज्यातील गोवा बनावटीच्या दारूचा अवैध बॉटलिंग कारखाना उद्ध्वस्त केला आहे.

तळगाव येथील एका हॉटेलच्या मागील खोलीत सुरू असलेल्या या अड्ड्यावर छापा टाकून १ कोटी ५ लाख ८१ हजार ५४० रुपयांचा दारूसाठा, अत्याधुनिक बॉटलिंग मशिन आणि लाखो बाटल्या-बुचांचा प्रचंड साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणात जागामालकासह गोव्यातील एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार उत्पादन शुल्क विभागाच्या संयुक्त पथकाने पंचांसह तळगाव येथील हॉटेलवर अचानक छापा टाकला. हॉटेलच्या मागील खोलीची झडती घेतली असता तेथे मोठ्या प्रमाणावर गोवा बनावटीची 'रॉयल ब्ल्यू व्हिस्की'चे लेबल असलेले ५६ बॉक्स आणि दोन ३० लिटरच्या कॅनमध्ये भरलेला ६० लिटर दारूचा ब्लेंड आढळून आला. 

घटनास्थळावरून अवैध दारू निर्मिती व बॉटलिंगसाठी लागणारे प्रचंड साहित्य जप्त करण्यात आले आहे. अत्याधुनिक बॉटलिंग मशिन, पाण्याचे मोठे टँकर्स (५०० व १००० लिटरच्या टाक्या), मोटर व होजपाइप, 'मेन्शन हाऊस' छापलेली तब्बल ८६,४०० पत्र्याची बुचे, 'ओशियन रॉक प्रीमियम ग्रेन व्हिस्की'चे लेबल रोल्स, १,८०० बॉक्समध्ये भरलेल्या ८६,४०० रिकाम्या बाटल्या आणि १,६८० काचेच्या बाटल्या. कागदी पुठ्याचे बॉक्स, जाळ्या, गोण्या, फर्निचर आणि २ मोबाईल संच आदी जप्त करण्यात आले आहे‌.

या कारवाईत पोलिसांनी जागामालक दिनेश शांताराम जैतापकर (रा. तळगाव, ता. राजापूर) आणि गोव्यातून दारू रॅकेट चालवणारा संशयित चंदन उर्फ शंकर बाळू पाटील (रा. कुट्टालिन, फ्रान्सिसवाडी, पणजी, गोवा) या दोघांना ताब्यात घेतले आहे.

राज्य उत्पादन शुल्क आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सहआयुक्त प्रसाद सुर्वे आणि रत्नागिरी अधीक्षक कीर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी भरारी पथक निरीक्षक अमित पाडळकर, कणकवली निरीक्षक नितीन शिंदे, उपअधीक्षक ओंकार महाजन व दोन्ही जिल्ह्यांतील अंमलदारांच्या संयुक्त पथकाने ही यशस्वी कारवाई केली. या प्रकरणाचा पुढील तपास भरारी पथक निरीक्षक अमित पाडळकर करत आहेत.