LIVE UPDATES

कुडाळ, मालवणात 'महसूल लोकअदालत'

Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: September 16, 2026 10:41 AM
views 32  views
#kokansadlive#news update#konkan update#

​कुडाळ : कुडाळ उपविभागात प्रलंबित असलेली महसुली प्रकरणे आणि वाद त्वरीत व गतिमान पद्धतीने निकाली काढण्यासाठी 'महात्मा जोतीराव फुले महसूल लोक अदालत अभियान' आयोजित करण्यात आले आहे. कुडाळच्या उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी ऐश्वर्या काळुशे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली असून, कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व नागरिक, शेतकरी व पक्षकारांनी या अभियानाचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे.  

​या अभियानांतर्गत उपविभागीय अधिकारी कार्यालय कुडाळ, तहसीलदार कार्यालय कुडाळ व मालवण, तसेच दोन्ही तालुक्यांतील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या महसुली अर्धन्यायिक प्रकरणांचा आपसी तडजोडीने निपटारा केला जाणार आहे. त्यानुसार ३० सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता कुडाळ उपविभागीय अधिकारी कार्यालय, कुडाळ तहसीलदार कार्यालय आणि कुडाळ तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये लोकअदालत पार पडेल. तर १ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता मालवण तहसीलदार कार्यालय आणि मालवण तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी कार्यालयांमध्ये सुनावणी व तडजोडीचे काम चालणार आहे.  

​अभियानादरम्यान उपविभागीय अधिकारी कार्यालयातील अधिकार अभिलेख व कुळकायदा विषयक प्रलंबित अपील प्रकरणे, तहसीलदार कार्यालयातील चालू दावे आणि मंडळ अधिकारी स्तरावरील तक्रारी फेरफार नोंदीच्या सुनावण्या प्राधान्याने हाताळल्या जातील. संबंधित वादी, प्रतिवादी, अपिलार्थी व गैरअपिलार्थी यांना नोटीस देऊन परस्पर तडजोडीने ही प्रकरणे निकाली काढण्यात येणार आहेत. तरी कुडाळ व मालवण तालुक्यातील सर्व संबंधित पक्षकारांनी आपल्या प्रलंबित प्रकरणांच्या तडजोडीसाठी विहित कालावधीत संबंधित महसूल न्यायालयाशी संपर्क साधून या अभियानाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.