
सावंतवाडी : पावसाळा सुरु झाला की हिरवाईने नटलेल्या आंबोलीला पर्यटकांची मुख्य पसंती असते. महादेव गड पॉईंट, कावळेसाद पॉईंट, आंबोलीतील मुख्य धबधब्यासह अनेक पॉईंटवर वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक भेट देत असतात. आंबोलीतील मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेताना पर्यटकांच्या समोर धबधब्याच्या वरुन साप पडल्याची घटना घडली आहे. यामुळे पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. सुदैवाने पर्यटक यातून बचावले. याबाबतचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
साप पडलेल्याची घटना अनेक पर्यटकांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पर्यटक आंबोलीतील मुख्य धबधब्यावर वर्षा पर्यटनाचा आनंद घेत होते. यावेळी पर्यटक धबधब्याच्या पाण्यात खेळण्याचा आनंद घेताना अचानक धबधब्याच्या वरुन पर्टकांच्या मध्येच साप पडला. या घटनेमुळे पर्यटकांमध्ये एकच गोंधळ उडाला. यावेळी पर्यटकांमध्ये एक लहान मुलगीही होती.
साप पडला त्यावेळी ते मुल थोडे बाजूला सरकल्याने लहान मुल सुदैवाने बचावले. तर सोबत असलेले अन्य काही लोक बाजूलाच धबधब्याच्या पाण्याचा आनंद घेत होते. दरम्यान, दोन दिवसांपूर्वीची ही घटना असून सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
सापाने कोणालाही दंश केला नसल्याने सुदैवाने जिवितहानी झाली नाही. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कीहींनी धबधब्याच्या ठिकाणी दगड निसरडे असतात. चुकुन पाय घसरल्यास इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे पर्यटनस्थळी लहान मुलांना नेणे टाळावे असे मत व्यक्त केले आहे.












