LIVE UPDATES

‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ संकल्पनेतून संविधान दिन साजरा

देवगड महाविद्यालयात आयोजन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: November 25, 2026 07:39 PM
views 25  views

देवगड : मेरा युवा भारत सिंधुदुर्ग (युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार) आणि नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय, देवगड यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. २६ नोव्हेंबर रोजी साजऱ्या होणाऱ्या संविधान दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या कार्यक्रमाची संकल्पना ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ अशी होती.

कार्यक्रमाची सुरुवात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार कुनुरे आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्रा. मिलिंद भिडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा युवा अधिकारी, सिंधुदुर्गचे सम्राट पाटील यांनी केले. त्यांनी कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट करून युवकांच्या सामाजिक योगदानाचे महत्त्व अधोरेखित केले.

यावेळी प्रमुख अतिथी व युथ आयकॉन, जिल्हा युवा पुरस्कारप्राप्त मिस फिजा मकानदार यांनी ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत २०४७’ या विषयावर पॉवरपॉइंट सादरीकरणाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विकसित भारताच्या उभारणीत युवकांची भूमिका, प्रत्येक भारतीय नागरिकांना संविधानाने दिलेले हक्क आणि कर्तव्ये यासारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर त्यांनी प्रकाश टाकला.

तसेच क्रीडा क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त व युथ आयकॉन लाजरी नलावडे यांनी युवकांनी क्रीडा क्षेत्रात अधिकाधिक योगदान द्यावे, खेळातून शिस्त, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित करावी तसेच विकसित भारत २०४७ हे राष्ट्रीय ध्येय साध्य करण्यासाठी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रम सहाय्यक अपेक्षा मांजरेकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ‘माय भारत’ पोर्टलवर नोंदणी करण्याचे आवाहन केले. या पोर्टलच्या माध्यमातून युवकांना विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्याची संधी उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेरा युवा भारत सिंधुदुर्ग ( युवा कार्यक्रम एव खेल मंत्रालय भारत सरकार) चे कार्यक्रम सहाय्यक अपेक्षा मांजरेकर, नलिनी शांताराम पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयचे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. मनोहर तेली, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्रा. स्नेहल जोईल आणि प्रा. प्रभाकर वाघ यांनी विशेष योगदान दिले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतीय संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नसून भारतीय लोकशाहीचा आत्मा आहे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही मूल्ये प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणावीत, तसेच युवकांनी व्यसनमुक्त राहून राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.