
रत्नागिरी : ठाणे मुख्यालय असलेल्या इम्पेरेटिव्ह बिझनेस व्हेंचर्स लि. या महिलांनी स्थापन केलेल्या तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन सेवा क्षेत्रातील कंपनीने ठाणे आणि पुणे येथील कार्यालयांमध्ये २,००० हून अधिक पदांसाठी मोठी भरती मोहीम जाहीर केली आहे. त्यामुळे कोकणातील फ्रेशर्स तसेच अनुभवी उमेदवारांना बीएफएसआय, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स आणि कृषी क्षेत्रात रोजगाराची संधी उपलब्ध झाल्याची माहिती कंपनीच्या संस्थापक, अध्यक्षा मंजुषा पैठणकर यांनी येथे दिली.
कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेकांचे नातेवाईक मुंबई, ठाणे, पुण्यात वास्तव्यास आहेत. त्यामुळे या जिल्ह्यातील उमेदवारांनी भरतीमध्ये जरूर अर्ज करावेत, असे आवाहन कंपनीने केले आहे. ग्राहक सेवा, व्हॉइस, नॉन-व्हॉइस, ई-मेल, चॅट आणि बॅक ऑफिस ऑपरेशन्स अशा विविध विभागांमध्ये बीएफएसआय, आरोग्यसेवा, ई-कॉमर्स आणि कृषी क्षेत्रांसाठी संधी उपलब्ध आहेत. बारावी उत्तीर्ण, पदवीपूर्व तसेच पदवीधर उमेदवारांसह फ्रेशर्स आणि अनुभवी व्यक्तींनाही अर्ज करता येणार आहे.
मंजुषा पैठणकर म्हणाल्या, "प्रत्येक नोकरी ही उज्ज्वल भविष्य घडवण्याची एक संधी असते, असा आमचा विश्वास आहे. या भरती मोहिमेच्या माध्यमातून तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देणे, आर्थिक स्वावलंबनाला चालना देणे आणि अर्थपूर्ण रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. कंपनीच्या एकूण कर्मचाऱ्यांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक महिला आहेत. कंपनीची देशभरात डिलिव्हरी सेंटर्स असून तिचे विस्तृत नेटवर्क ७०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कार्यरत आहे."
इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळ: www.theimperative.in यावर माहिती घ्यावी आणि [email protected] | [email protected] येथे अर्ज पाठवावेत. अधिक माहितीसाठी वागळे इंडस्ट्रियल इस्टेट, ठाणे (पश्चिम) – ४००६०४, न्याती एन्थ्रल, खराडी, पुणे – ४११०१४ येथे संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








