
कुडाळ : तालुक्यातील पणदूर येथे झालेल्या डबलबारी दरम्यान बुवांकडून एकमेकांवर टीका-टिप्पणी करण्यात आल्याच्या प्रकरणावरून सिंधुदुर्ग भजन मंडळाच्या अध्यक्षांनी संबंधित बुवांवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. मात्र, ही कारवाई केवळ एकाच प्रकरणापुरती मर्यादित न ठेवता यापूर्वीही डबलबारी कार्यक्रमांत अश्लील भाषा व शिवीगाळ करणाऱ्या सर्वच भजनीबुवांवर समान कारवाई करावी, या प्रमुख मागणीसाठी पाट येथील राजाराम खोर्जुवेकर यांनी कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
यापूर्वीही अनेकदा डबलबारीच्या सामन्यांदरम्यान बुवांमध्ये खालच्या भाषेत टीका, शिवीगाळ आणि वादाचे प्रकार घडले आहेत. असे असताना त्या सर्व जुन्या प्रकरणांवर पडदा का टाकला गेला? असा संतप्त सवाल खोर्जुवेकर यांनी उपस्थित केला आहे. भजन परंपरेचे पावित्र्य राखण्यासाठी यापूर्वी नियमभंग करणाऱ्या प्रत्येकाला या कारवाईला सामोरे जावेच लागेल, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.
दरम्यान, या आमरण उपोषणाची अधिकृत माहिती कुडाळ तहसीलदार आणि धर्मादाय आयुक्तांना देण्यात आली असून, भजनीबुवांच्या अध्यक्षांनाही ई-मेलद्वारे कळविण्यात आले आहे अशी माहिती राजाराम यांनी दिली. भजनी मंडळाचे मुंबई अध्यक्ष जोपर्यंत स्वतः कुडाळ येथे येऊन प्रत्यक्ष भेट घेत नाहीत आणि आपल्या भावना जाणून घेत नाहीत, तोपर्यंत हे आमरण उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा इशारा राजाराम खोर्जुवेकर यांनी दिला आहे.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








