
सावंतवाडी : दक्षिण कोकणचे प्रति पंढरपुर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री देवी सोनुर्ली माऊलीचा वार्षिक जत्रौत्सवाला लाखो भाविकांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्र राज्यासह गोवा, कर्नाटक राज्यातूनही भाविक सोनुर्ली नगरीत दाखल झाले होते. भक्तिभावाने देवी माऊली चरणी ते लीन झाले.
तब्बल दोन दिवस चालणाऱ्या सोनुर्ली देवी माऊलीच्या जत्रौत्सवाला बुधवारी पहाटे उत्साहात प्रारंभ झाला. मुर्तीवर पहाटे दुग्धाभिषेक व विधीवत पूजन झाल्यानंतर महानैवद्य देवी चरणी अर्पण करत भाविक भक्तांसाठी देवीचे दर्शन खुले करण्यात आले. कुळघरात देखील उत्साहाचे वातावरण होते.
पोलिस व स्वयंमसेवकांकडून आलेल्या भाविकांना रांगेत सोडून देवीची दर्शन देण्यात आले. यावेळी ओटी भरणे, नारळ, केळी ठेवण्यासाठी भक्तांची गर्दी झाली होती. जत्रोत्सव उत्साहात पार पडण्यासाठी पोलिस प्रशासनासह देवस्थान कमिटी व स्थानिक भक्त मंडळाने नियोजन केले होते. मात्र, भक्तांचा प्रचंड जनसागर उसळल्याने भाविकांना बराचवेळ गर्दीत रहावे लागले. देवीच्या दर्शनासाठी चार चार तास रांगेत उभे राहून भाविकांनी दर्शन घेतले. सकाळपासूनच देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी ओसंडून वाहत होती. दुपारनंतर ही गर्दी अधिकच वाढत गेली.
लोटांगणापूर्वी संपूर्ण दिवस माऊलीच्या गाभाऱ्यात ओट्या भरणे, केळी ठेवण्याचा कार्यक्रम सुरु होता. सकाळ पासूनच मंदिर परिसरात हजारोंच्या संख्येने भाविकांच्या लांबच लांब रांगा पहायला मिळत होत्या. भक्तांना उन्हाचा चटका बसू नये यासाठी देवस्थान कमिटीकडून मंडप व्यवस्था करण्यात आली होती. स्वयंसेवक नेमून त्याठिकाणी योग्य ती खबरदारी ठेवण्यात आली होती. तसेच मुंबई येथील भक्तांकडून खास पाण्याची सोय भाविकांना करण्यात आली होती.
सावंतवाडी एसटी डेपोतून जादा बसेस सोडण्यात आल्याने गाड्या भरुन भाविक सोनुर्लीत दाखल होत होते. प्रांगणात हॉटेल, दुकाने व इतर स्टॉलही मोठ्या प्रमाणात उभारले होते. केळी, फुले यांचे स्टॉलही मोठया प्रमाणात लागले होते. कोकणातील सुप्रसिद्ध मालवणी खाज्याची दुकानेही सजली होती. खेळण्यांची दुकाने व गृहोपयोगी वस्तुंचीही दुकाने थाटली होती. जत्रौत्सवाला येणाऱ्या भाविकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती.
तसेच देवी माऊलीच्या वार्षिक जत्रोत्सवाला दरवर्षी प्रमाणे यावर्षीही विद्युत रोषणाई आणि फुलांची आरास करण्यात आली. रात्रीच्यावेळी विद्युत रोषणाईमुळे मंदिर उजळून निघाले होते. तर गावात प्रत्येकाच्या घरी विद्युत रोषणाई असल्याने एकप्रकारे नवचैतन्य आले होते.
जत्रोत्सवाला सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री दीपक केसरकर यांनी हजेरी लावत श्री देवी माऊलीचे सकाळी दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटीकडून त्यांचा सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर माजी मंत्री प्रवीण भोसले, भारतीय जनता पार्टीचे युवा नेते विशाल परब, सामाजिक कार्यकर्ता अर्चना घारे परब यांनीही श्रीदेवी माऊलीचे दर्शन घेतले. त्यांचाही देवस्थान कमिटी कडून येतोचित सन्मान करण्यात आला.
ताजी बातमी
View all




संबंधित बातम्या
View all








