
- शिबिरात जिल्ह्यात नसलेले स्पेशालिस्ट डॉक्टर बाहेरून आणणार
- पहिले शिबिर २७ फेब्रुवारीला कणकवलीत
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरकारी आरोग्यव्यवस्था बिकट असून याबाबत जनतेमध्येही नाराजी आहे. वास्तविक जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्था सुधारावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहेतच. मात्र, तोपर्यंत जिल्ह्यातील रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत, त्यासाठी जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये सध्या जिल्ह्यात नसलेले स्पेशालिस्ट डॉक्टर जिल्ह्याबाहेरील वेगवेगळ्या शहरांमधून आणण्यात येणार आहेत. पहीले शिबिर येत्या 27 फेब्रुवारीला कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे, अशी माहिती पालकमंत्री नितेश राणे यांनी दिली. येथील प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत श्री. राणे बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील आणि इतर डॉक्टर उपस्थित होते.
नितेश राणे म्हणाले, जिल्ह्यात स्पेशलिस्ट डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेकदा रुग्णांना गोवा - बांबोळी गाठावे लागते. याबाबत आमदार निलेश राणे यांनी सुद्धा जिल्हा नियोजन बैठकीत नाराजी व्यक्त केली होती. त्याच अनुषंगाने आम्ही हे आरोग्य शिबिर राबविण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग, शासकीय महाविद्यालय सिंधुदुर्ग, जिल्हा आरोग्य विभाग अशा सर्वांनी मिळून घेतल्याचेही राणे म्हणाले.
या शिबिराविषयी अधिक माहिती देताना जिल्हा शल्यचिकित्सक श्रीपाद पाटील म्हणाले, स्पेशालिटी शिबिर 27 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी तीन या वेळेत कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे होणार आहे. त्यासाठीची पूर्वतयारी प्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रे येथे करण्यात येतील. हे शिबिर सर्वप्रथम वैभववाडी, देवगड, कणकवली, मालवण, कुडाळ अशा पाच तालुक्यांसाठी राबविण्यात येत आहे. या पाचही ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे येथे रुग्णांची प्राथमिक तपासणी होणार आहे. त्यानंतर 23 रोजी वैभववाडी ग्रामीण रुग्णालय, 24 रोजी देवगड ग्रामीण रुग्णालय आणि २५ रोजी कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे तज्ञ डॉक्टरांची टीम दाखल होईल. तेथे रुग्णांची आणखी एक तपासणी होईल. तर अंतिम आरोग्य शिबिर 27 रोजी कणकवली होणार आहे. आरोग शिबिराच्या जनजागृतीबाबत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर समुदाय आरोग्य अधिकारी आशा स्वयंसेविका आरोग्य कर्मचारी हे घरोघरी जाऊन नागरिकांना माहिती देणार आहेत.
शिबिरात सध्या जिल्ह्यात नसलेले स्पेशालिस्ट डॉक्टर उपस्थित राहून रुग्णांची तपासणी, गरजेनुसार उपचार व शस्त्रक्रिया करणार आहेत. यामध्ये हृदयरोग, जनरल मेडिसिन, ग्रंथी रोगतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, कर्करोगतज्ञ, पोटांचे विकारतज्ञ, अस्थिरोगतज्ञ, मूत्रविकारतज्ञ असे विविध तज्ञ डॉक्टर्स उपस्थित असणार असल्याचेही डॉ. श्रीपाद पाटील यांनी सांगितले.
कठोर भूमिका घेणार
दरम्यान जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेबाबत नागरिकांमध्ये मोठी नाराजी आहे. सरकारी रुग्णालयांमध्ये हलगर्जीपणा सुरू असून आजाराचे निदान करताना चुका केल्या जात आहेत. याबाबत आरोग्यमंत्री हसन मुश्रीफ व श्री. आबिटकर यांचे लक्ष वेधणार आहे. हलगर्जीपणाबाबत राज्यशासन कठोर भूमिका घेणार असल्याचा इशाराही राणे यांनी दिला.














