
Health Tips for the Monsoon Season : उन्हाळ्यानंतर पावसाळा सुरू होताच आजार शरीरावर परिणाम करू लागतात. पावसाळ्यात व्हायरल ताप ही एक समस्या आहे. पावसाळा सुरू होताच याची लागण होण्याचा धोका वाढतो. तापमानात होणाऱ्या बदलांमुळे, अनेकदा घसा खवखवणे आणि सर्दी यांसारखी लक्षणे दिसू लागतात. तापामुळे शरिरात अशक्तपणा जाणवतो. तसेच घसा खवखवणे आणि सर्दीमुळे घसा, छाती आणि डोकेदुखीचा त्रास होतो. लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणालाही व्हायरल ताप येऊ शकतो. चला तर मग, व्हायरल तापापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी उपाय जाणून घेऊया.
तापाची सुरुवातीची लक्षणे दिसल्यास वेळीच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे. सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, घसा खवखवणे, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा आणि नाक वाहणे किंवा नाक बंद होणे यांचा समावेश असू शकतो. अशा वेळी विश्रांती घ्या आणि कोमट पाणी प्या. ताप जास्त असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणीतीही औषधे घेऊ नका.
पावसाळ्यात दरवाजांचे हँडल, मोबाईल फोन तसेच इतर वस्तूंवर व्हायरस आणि जीवाणू असू शकतात. साबण आणि पाण्याने हात धुवा. घरात आल्यावर, जेवणापूर्वी आणि शौचालयाचा वापर केल्यानंतर हात धुवा. यावेळी किमान ६० टक्के अल्कोहोल असलेले हँड सॅनिटायझर वापरा. हात न धुता डोळे, नाक किंवा तोंडाला स्पर्श करणे टाळा.
मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला तापाच्या धोक्यापासून वाचवते. आहारात हंगामी फळे आणि भाज्यांचा समावेश करा. डाळी, दूध, दही, अंडी, हळद, आले आणि लसूण यांसारख्या पदार्थांचे सेवन करा. तसेच, व्हिटॅमिन सी आणि झिंकयुक्त पदार्थांचा समावेश करा. तळलेले पदार्थ आणि जंक फूडचे अतिसेवन टाळा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होईल.
पावसाळ्यात पाण्यावाटे पसरणाऱ्या संसर्गजन्य आजारांचा धोका वाढतो. उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. उघड्यावर मिळणारी शितपेये पिणे टाळा. दिवसभरात पुरेसे पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राखा. ओल्या कपड्यांमध्ये जास्त वेळ राहिल्याने शरीराचे तापमान कमी होऊ शकते आणि संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पावसात भिजल्यानंतर त्वरित कपडे बदला. केस पूर्णपणे कोरडे करा. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि सर्दी-फ्लूचा धोका वाढतो. त्यामुळे पुरेशी झोप आणि विश्रांती घ्या. दररोज साधारण ७-८ तास झोप घेण्याचा प्रयत्न करा आणि अति तणाव टाळा. हलका व्यायाम किंवा योगासने करा.
ताप, खोकला, शिंका किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याने संसर्ग पसरू शकतो. गर्दीच्या ठिकाणी गरज असल्यास मास्क वापरा. आजारी व्यक्तीला आपला टॉवेल, भांडी किंवा पाण्याची बाटली देणे टाळा. खोकताना किंवा शिंकताना रुमाल किंवा कोपराचा वापर करून नाक व तोंड झाकून घ्या. जर ताप १०२ फॅरनहाइट किंवा त्यापेक्षा जास्त असेल तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास व ताप ३ दिवसांपेक्षा जास्त काळ टिकून राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
(वाचकांपर्यंत वरील बातमी कोकणसाद लाईव्ह केवळ माहिती म्हणून पोहचवत आहे. कोणतेही उपचार व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.)














