
नवी मुंबई : डोकेदुखी ही एक सामान्य समस्या असली तरी काही लोकांना मायग्रेनचा (Migraine) त्रास असतो. यावेळी सामान्य डोकेदुखी आणि मायग्रेन यांमधील फरक ओळखणे नेहमीच सोपे नसते. डॉक्टरांच्या मते, मानसिक तणावामुळे होणारी डोकेदुखी हा डोकेदुखीचा सर्वात सामान्य प्रकार आहे; याउलट, मायग्रेन ही केवळ डोकेदुखी नसून एक विशिष्ट मज्जासंस्थेशी संबंधित (Neurological) स्थिती आहे. ज्यासाठी योग्य उपचारांची आवश्यकता असते. सामान्य डोकेदुखी आणि मायग्रेन यांची लक्षणे, कारणे आणि उपचार पद्धती वेगळ्या असतात. त्यामुळे यांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. चला तर याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
याबाबत डॉक्टरांचे म्हणणे आहे की, सामान्य डोकेदुखी ही सहसा 'टेन्शन हेडेक' असते. यात डोक्याच्या दोन्ही बाजूंना, कपाळावर आणि डोक्याच्या मागील भागात वेदना होतात. काही रुग्णांमध्ये ही वेदना मानेपर्यंत पसरू शकते. वेदनेची तीव्रता सौम्य ते तीव्र असू शकते. मानसिक तणाव किंवा थकवा यामुळे अनेकदा सामान्य डोकेदुखी उद्भवते. तसेच मोबाईल फोन किंवा लॅपटॉपचा अतिवापर, बसण्याची चुकीची पद्धत किंवा अपुरी झोप ही याची काही कारणे असू शकतात. विश्रांती घेतल्यास आणि डोकेदुखीवरील सामान्य औषधे घेतल्यास वेदना बऱ्याचदा कमी होतात.
मायग्रेनची सामान्य कशी ओळखावी?
मायग्रेन ही काही सामान्य डोकेदुखी नाही. यात डोक्याच्या एका बाजूला तीव्र वेदना होते. काही रुग्णांना मळमळणे आणि प्रखर प्रकाशाच्या संपर्कात आल्यास वेदना वाढतात. तसेच वेगाने हालचाल केल्यास वेदना अधिक तीव्र होतात. झोप पूर्ण न होणे आणि स्क्रीनचा अतिवापर यामुळे मायग्रेनचा अटॅक येऊ शकतो. मायग्रेनसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आणि योग्य उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. कारण उपचार न केल्यास ही समस्या अधिक वाढून आयुष्यभर राहू शकते. मायग्रेनची समस्या चिंता आणि तणाव, अॅसिड किंवा पोटात गॅस झाल्यामुळे, निद्रानाश, कडक सूर्यप्रकाश आणि उष्णतेमुळे होण्याची शक्यता असते.
(वाचकांपर्यंत वरील बातमी कोकणसाद लाईव्ह केवळ माहिती म्हणून पोहचवत आहे. यातून कोकणसाद लाईव्ह कोणताही दावा करीत नसून कोणतेही उपचार व औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.)














