
सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी आणि आर्थिक अडचणींमुळे कोणालाही उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, या उद्देशाने भारतीय जनता पार्टीच्यावतीने ११ ते १६ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ''भव्य मोफत महाआरोग्य शिबिरा''चे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा शुभारंभ उद्या होणार असून रेडी, मळेवाड, आरोंदा जिल्हा परिषदेतून याला प्रारंभ होणार आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्यावतीने करण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात येणाऱ्या 'सेवा संकल्प अभियान-२०२६' अंतर्गत, भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच पालकमंत्री नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा नेते विशाल प्रभाकर परब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या पुढाकारातून या महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
उद्या रेडी, मळेवाड व आरोंदा जिल्हा परिषद मतदारसंघात सुदर्शन हॉल येथे सकाळी 10 वाजता भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात येणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य व शिक्षण सभापती प्रितेश राऊळ उपस्थित राहणार आहेत. भाजप सिंधुदुर्ग व कै. सदाशिव सखाराम मराठे सेवाभावी ट्रस्ट मळेवाडच्या माध्यमातून याचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये नागरिकांना आरोग्य तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शनासह वैद्यकीय तज्ज्ञांकडून आरोग्य तपासणी व वैद्यकीय मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हृदयरोग, नेत्ररोग, अस्थिरोग, स्त्रीरोग, बालरोग, कान-नाक-घसा यांसह विविध वैद्यकीय विभागांतील तपासणी आणि आवश्यकतेनुसार पुढील उपचारांसाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
तसेच रुग्णांना पुढील उपचार किंवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असेल अशा रुग्णांना उपलब्ध शासकीय आरोग्य योजनांच्या माध्यमातून उपचार मिळवून देण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन व समन्वय साधण्यावरही भर देण्यात येणार आहे. या मोफत महाआरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने करण्यात येत आहे.














