
वैभववाडी : भक्तीचा मार्ग अनुसरत समाजसेवेचा वसा जपणाऱ्या करूळ येथील वारकरी बांधवांनी जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी दिंडवणेवाडी येथे श्रमदानातून दोन वनराई बंधारे उभारण्यात आले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमात २५ ते ३० वारकरी व ग्रामस्थ सहभागी झाले.
वारकरी बांधवांनी एकत्र येत दगड-मातीच्या साहाय्याने बंधारे उभारून वाहून जाणारे पाणी अडविले. या उपक्रमामुळे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होऊन भूजलपातळी वाढण्यास हातभार लागणार आहे. तसेच परिसरातील विहिरी आणि कूपनलिकांच्या पाणीपातळीत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे.
वारीतून भक्ती आणि श्रमदानातून समाजसेवा या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला ग्रामपंचायत करूळचे सहकार्य लाभले. सरपंच नरेंद्र कोलते यांनीही मोलाचे सहकार्य केले. बंधारे उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या दिंडवणेवाडी ग्रामस्थांचे वारकरी बांधवांनी आभार मानले. या उपक्रमात वारकरी चंद्रकांत पाटील, अनिल पाटील, विजय सावंत, प्रदीप कोलते, प्रदीप मोरे, अविनाश पडवळ, दीपक खोपडे यांच्यासह वारकरी बांधव आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.










