
सावंतवाडी : जलसंधारण आणि पाणी अडवा-पाणी जिरवा अभियानाअंतर्गत कारिवडे पेडवेवाडी येथील 'हळदीचा कणा' येथे ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विविध संस्थांच्या संयुक्त विद्यमाने कच्चा वनराई बंधारा यशस्वीरीत्या बांधण्यात आला. वाढत्या उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासू नये आणि भूगर्भातील पाण्याची पातळी वाढावी, या उद्देशाने या बंधाऱ्याची उभारणी करण्यात आली.
या उपक्रमासाठी कारिवडे गावच्या सरपंच आरती माळकर, उपसरपंच महेश गावकर, पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळुसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच ग्रामपंचायत सदस्या प्रतिभा जाधव, नेहा गावडे, संपर्क अधिकारी. संजय नाईक, नवनाथ शिंदे, पाणी फाउंडेशनचे फिल्ड अधिकारी, उमेद अभियानाचे प्रभाग समन्वयक श्री. भिडे, पोलीस पाटील प्रदिप केळुसकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष शंकर मेस्त्री, माजी सरपंच तानाजी साईल आणि कृषी सेवक,शुभम सरोळकर,ग्रामपंचायत अधिकारी भरत बुंदे या मान्यवरांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून ग्रामस्थांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले.
तसेच शारदा बोभाटे,सी. आर.पी. हेळेकर व कुलस्वामिनी ग्रामसंघातील सर्व महिला, महिला बचत गटांच्या पदाधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने श्रमदानासाठी उपस्थित होते. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांतून आणि उत्स्फूर्त सहभागातून हा वनराई बंधारा पूर्ण झाला असून, यामुळे परिसरातील विहिरींच्या आणि बोअरवेलच्या पाण्याची पातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे.










