LIVE UPDATES

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त ११ ऑक्टोबरला तुळस येथे रक्तदान शिबिर

वेताळ प्रतिष्ठान तर्फे सलग ४० व्या शिबीराचे आयोजन : जिल्ह्यातील रक्ताचा तुटवडा दूर करण्यासाठी रक्तदात्यांना आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 09, 2026 19:31 PM
views 27  views

वेंगुर्ले : रक्ताची वाढती गरज लक्षात घेता जिल्ह्यातील रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे आणि रक्तसाठ्यावरील ताण कमी व्हावा, यासाठी रक्तदानाची चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक आहे. याच सामाजिक जाणिवेतून सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस यांच्या वतीने, बाल गोवर्धन कला क्रीडा मंडळ, तुळस–राऊळवाडी यांच्या सहयोगाने रविवार, ११ ऑक्टोबर रोजी तुळस येथील उत्सव मंगल कार्यालयात सलग ४० व्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९ वाजता शिबिराला सुरुवात होणार आहे.

अपघातग्रस्त, शस्त्रक्रिया होणारे तसेच विविध आजारांवर उपचार घेणाऱ्या रुग्णांना वेळोवेळी रक्ताची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत रक्तदात्यांनी केलेले रक्तदान रुग्णांसाठी जीवनदायी ठरते. रक्ताची गरज असलेल्या रुग्णांना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे, तसेच नागरिकांमध्ये रक्तदानाविषयी जागरूकता वाढावी, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. रक्तदान ही केवळ सामाजिक कृती नसून माणुसकीची महत्त्वपूर्ण जबाबदारी आहे.

याच भावनेतून वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळस गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने रक्तदान शिबिरांचे आयोजन करत आहे. प्रतिष्ठानचे हे सलग ४० वे रक्तदान शिबिर असून, या माध्यमातून रक्तदानाची चळवळ सातत्याने सुरू ठेवत समाजसेवेचा वसा जपला जात आहे. अधिकाधिक नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदतीचा हात द्यावा, हा प्रतिष्ठानचा प्रयत्न आहे.

विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित हा उपक्रम ‘वाढदिवसाचा आनंद समाजसेवेतून’ या भावनेला अधोरेखित करणारा आहे. वाढदिवसाचे औचित्य साधून रक्तदानासारख्या जीवनदायी उपक्रमातून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या माध्यमातून दिला जात आहे.

या रक्तदान शिबिरात युवक, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान करावे आणि जिल्ह्यातील रक्ताची गरज पूर्ण करण्यासाठी आपले योगदान द्यावे, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

नावनोंदणीसाठी महेश राऊळ (९४०५९३३९१२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग–तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परूळकर आणि बाल गोवर्धन चे अध्यक्ष नाना राऊळ यांनी केले आहे.