
सावंतवाडी : दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईवर मात करण्यासाठी आणि जलसंधारण तसेच पाणी बचतीची कामे प्रभावीपणे राबवण्यासाठी पालकमंत्री, सिंधुदुर्ग यांच्या निर्देशांनुसार सावंतवाडी नगरपालिकेच्यावतीने एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोंसले यांच्या विशेष पुढाकारातून लोकसहभागातून मातीचे बांध घालण्याचा हा महत्त्वपूर्ण उपक्रम यशस्वीरित्या पार पडला.
या उपक्रमांतर्गत सावंतवाडी शहरातील पुढील ठिकाणी मातीचे बांध घालण्याचे काम लोकसहभागातून करण्यात आले: सालईवाडा येथील विनोद सावंत यांच्या घराजवळील नाल्यामध्ये माठेवाडा येथील अवधूत नार्वेकर यांच्या घराजवळील नाल्यामध्ये या सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमात लोकप्रतिनिधी, संस्था आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कार्यक्रमाला नगरपालिकेचे सर्व समितीचे सभापती, नगरसेवक तसेच युवराज लखमराजे सावंत भोंसले त्याचप्रमाणे या कार्यात एस. पी. के. कॉलेजचे विद्यार्थी, रोटरी क्लब, लायन्स क्लब, आरोग्य कृती समिती आणि सावंतवाडी नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून श्रमदान केले.
नगराध्यक्षांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे व पुढाकारामुळे शहरातील जलसंधारण कामांना मोठी गती मिळाली आहे. नगरपालिका कडून शहरातील अजून ही काही ठिकाणी मातीचे बांध घातले जातील, त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाईवर मात करता येईल असा विश्वास नगराध्यक्षांनी व्यक्त केला.










