
सावंतवाडी : विरोधकांकडून आरोग्य विभागावर केलेले आरोप चुकीचे असून त्या कोणतंही तथ्य नाही. प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून कौन्सिल ठरावाने निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आल्यानंतरच मशिन खरेदी करण्यात आल्याची माहिती आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी देत आरोप खोडून काढले आहेत.
ते म्हणाले, स्वच्छ भारत मिशन २.० अंतर्गत नगरपरिषदेसाठी घनकचरा प्रक्रिया व विल्हेवाट प्रकल्पाची उभारणी व विकास कामे करण्यासाठी महाराष्ट्र शासन नगरविकास विभाग शासन परिपत्रकानुसार मार्स प्लॅनिंग अँड इंजिनिअरिंग सव्हींसेस प्रा.लि. यांची नियुक्ती करण्यात आलेली होती. या एजन्सीमार्फत सादर केलेल्या अहवालास महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेमार्फत ८८,५७,३३६ रुपये एवढ्या रक्कमेस तांत्रिक मान्यता प्राप्त झालेली होती.
त्यानुसार हा प्रकल्प अहवाल संचालक स्वच्छ महाराष्ट्र अभियान यांजकडे प्रशासकीय मान्यतेसाठी पाठविण्यात आला होता. प्रकल्प अहवालास प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेली असून कौन्सिल ठराव क्र. ३५ दिनांक २४/०२/२०२६ च्या ठरावाने निविदा प्रक्रिया राबविण्यास मान्यता देण्यात आली. ह्यामध्ये २ पार्ट असून पार्ट १ मशीनरी व पार्ट २ सिव्हिल वर्क असा असून मशीनरी पुरविणे कामी आरोग्य विभागातून निविदा प्रक्रिया राबविण्यात आलेली.
निविदेतील एकूण रक्कम २९ लाख १२ हजार ०७९ रुपये एवढी असून सदरची रक्कम SWM/DSR/2023-24 मधील दरानुसार निविदा प्रक्रिया करण्यात आलेली. त्यामुळे विरोधकांनी केलेले आरोप हे चुकीचे असल्याचा दावा सभापती सुधीर आडीवरेकर यांनी केला आहे.










