LIVE UPDATES

Nilesh Rane Malvan Water Crisis : ‘अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा खपवून घेणार नाही'

पाणीटंचाईच्या प्रश्नावर निलेश राणे आक्रमक : मालवणच्या पाणीटंचाईसाठी ७.४९ कोटींचा आराखडा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 10, 2026 16:40 PM
views 89  views
MLA Nilesh Rane chairs a water scarcity review meeting in Malvan, Sindhudurg

मालवण : आज जिल्ह्यात भीषण दुष्काळ आणि पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण होत आहे. अशा परिस्थितीत सर्व अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्यातून लोकांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. शासकीय कामात नको ती कागदपत्रे मागून अडवणूक करू नका, सरसकट पंचनामे करून तातडीने मदत पोहोचवा. अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा आणि चुकीचा कारभार अजिबात खपवून घेतला जाणार नाही, असा थेट इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला.

समर्थ मंगल कार्यालय, कोळंब येथे आमदार निलेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मालवण तालुक्याची 'सन २०२६-२७ संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा आढावा बैठक' पार पडली. या बैठकीला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल, नगराध्यक्षा ममता वराडकर, उपनगराध्यक्ष दीपक पाटकर, बाबा परब, सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती घनश्याम झाड, जिल्हा परिषद बांधकाम सभापती संतोष साटविलकर, तहसीलदार गणेश लव्हे, गटविकास अधिकारी परागिनी पाटील, किसन मांजरेकर यांच्यासह तालुक्यातील सर्व खात्यांचे शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आढावा बैठकीदरम्यान लघु पाटबंधारे विभागाच्या कामाकाजावर आमदार राणे यांनी तीव्र शब्दांत संताप व्यक्त केला. दुरुस्तीची अंदाजपत्रके पूर्णपणे चुकीची आणि वस्तुस्थितीला धरून नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विभागाने दाखवलेल्या १५४ बंधाऱ्यांपैकी प्रत्यक्षात केवळ ३६ बंधाऱ्यांमध्येच योग्य पद्धतीने पाणी अडवले गेले आहे. २ कोटी ६४ लाख रुपयांचा दाखवलेला खर्च योग्य नसून २५ टक्के बंधारे सोडल्यास तब्बल ७५ टक्के बंधारे निकामी किंवा अयोग्य स्थितीत आहेत.

अधिकारी बंधाऱ्यांची पाहणी केल्याचा दावा करतात, पण प्रत्यक्ष पाहणीच्या वेळी २७ माणसेही उभी राहिली नाहीत. अधिकारी खोटी माहिती देत असून त्यांच्या कामावर माझा तीव्र आक्षेप आहे, असे सांगत त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच खडेबोल सुनावले.

पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता आमदार निलेश राणे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. जानेवारी महिन्यापासून नागरिकांना टँकरद्वारे सुरळीत पाणीपुरवठा व्हावा यासाठी टँकरचे नियोजन आणि आराखडा आताच अंतिम करा. तालुक्यात ३५ टक्के वनराई बंधाऱ्यांची कामे झाली असली तरी जिथे प्रत्यक्ष गरज आहे, तिथे प्राधान्याने कामे पूर्ण करा. तहसीलदारांनी सर्व ग्रामसेवकांना कडक सूचना द्याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना शासकीय कागदपत्रांच्या कचाट्यात अडकावे लागणार नाही.

मालवण तालुका कधीच कोणाकडे मागायला जात नाही. येथील शेतकरी आणि मच्छीमार स्वाभिमानी आहेत. त्यामुळे या संकटाच्या काळात मालवणला सरसकट मदत मिळालीच पाहिजे असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले. 

बैठकीत उपस्थितांशी संवाद साधताना राणे म्हणाले, "तुमच्या गावात किंवा माहितीतील वाड्यांमध्ये पाणीटंचाईचे प्रश्न राहून गेले असतील तर आत्ताच बोला. आज सर्व विभागांचे अधिकारी समोर आहेत. निधीची तरतूद आजच्या बैठकीच्या आधारावरच केली जाईल. नंतर नवीन प्रस्ताव दिले तर त्याला विलंब होतो किंवा वशिला लावूनही उपयोग होणार नाही. त्यामुळे ही संधी साधून आपापल्या भागातील विहिरी, नळ योजना आणि कृषी विभागाशी संबंधित अडचणी आताच नोंदवा असे आवाहन त्यांनी केले.

बैठकीत मालवण तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीचा लेखाजोखा मांडण्यात आला.८ गावे, ४३४ वाड्या असा मिळून ७ कोटी ४९ लाख ५ हजार रुपयांचा आराखडा मांडण्यात आला. यात काही नवीन कामेही सुचविण्यात आली.