LIVE UPDATES

आरोस विद्याविहारमध्ये ‘विद्यार्थी संस्कार जागर’

शिवकालीन शस्त्रे व ऐतिहासिक साधनांचे प्रदर्शन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: October 10, 2026 19:55 PM
views 25  views

सावंतवाडी : अभिजात मराठी भाषा सप्ताहानिमित्त तालुक्यातील आरोस विद्याविहार इंग्लिश स्कूलमध्ये मळगावच्या शिवशंभू ग्रुपतर्फे ‘विद्यार्थी संस्कार जागर’ या आगळ्यावेगळ्या मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ऐतिहासिक साधने, गड-किल्ल्यांचे महत्त्व, संवर्धन शिवकालीन शस्त्रांची माहिती तसेच भारतीय सणांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व समजावून सांगण्यात आले. यावेळी आयोजित ऐतिहासिक साधने व शस्त्रांच्या प्रदर्शनाला प्रशातेचे तसेच आरोस येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी शिवशंभू ग्रुपच्या सदस्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक सदाशिव धूपकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी शिवशंभू ग्रुपचे सुनील राऊळ, ज्ञानेश्वर राणे, संदीप राऊळ, सहदेव राऊळ, शिक्षक प्रतीक पाटील, राजेश पाटकर, पालेकर सर, गावडे सर, निलेश देऊळकर, ग्रंथपाल सतीश राऊळ आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या प्रारंभी मुली व महिलांच्या आत्मसंरक्षणाबाबत जनजागृती करणारे व्हिडिओ दाखविण्यात आले. सुनिल राऊळ यांनी शिवशंभू ग्रुपतर्फे राबविण्यात येणाऱ्या बलिदान मास, दुर्गामाता दौड आदी उपक्रमांची माहिती दिली. तसेच गड-किल्ल्यांचे ऐतिहासिक महत्त्व विशद करताना त्यांच्या संवर्धनाची गरज अधोरेखित केली.

काही किल्ल्यांवर मद्यपानासारखे गैरप्रकार घडत असून, त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र्य आणि महत्त्व कमी होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. किल्ल्यांवर प्लास्टिकच्या बाटल्या, खाद्यपदार्थांचे अवशेष आणि कचरा टाकल्यामुळे ऐतिहासिक जलस्रोत दूषित होत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी पुरेसा निधी, सुरक्षा व्यवस्था आणि योग्य नियोजनाची आवश्यकता असल्याचे सांगत त्यांनी या ऐतिहासिक वारशाच्या जतनासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. याशिवाय गुढीपाडवा, वटसावित्री, नागपंचमी, गणेशोत्सव आणि दिवाळी या सणांचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्वही त्यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले.

इतिहास संशोधक ज्ञानेश्वर राणे यांनी विद्यार्थ्यांना इतिहासाच्या अभ्यासात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या विविध साधनांची चित्रांच्या माध्यमातून माहिती दिली. भौतिक साधनांमध्ये चलन, गड-किल्ले, वास्तू, समाधी, कबर, वीरगळ, सतीशिळा आणि तर लिखित साधनांमध्ये ताम्रपत्र, भूजपत्र, मोडी लिपीतील पत्रे, ग्रंथ आणि शिलालेख यांचा समावेश कसा होतो, हे त्यांनी स्पष्ट केले.

तसेच शिवकालीन शस्त्रांबद्दलमाहिती देताना दांडपट्टा, मराठा बुर्ज, मराठा धोप, नागिण तलवार, उर्मी, बिचवा, जिरेटोप, शिवकालीन कट्यार आदी ऐतिहासिक वस्तू व शस्त्रांची माहिती देण्यात आली. या शस्त्रांचे ऐतिहासिक महत्त्व आणि त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर उलगडण्यात आला. ऐतिहासिक साधने व शस्त्रांचे प्रत्यक्ष प्रदर्शन पाहण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांना इतिहासाची माहिती अधिक प्रभावीपणे समजून घेता आली. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती आणि वारसा संवर्धनाविषयी नवी माहिती मिळाली.

इयत्ता सहावीतील विद्यार्थिनी वैदयी कामत हिने मराठी भाषा गौरव दिनाबद्दल आपले मनोगत व्यक्त करत शिवशंभू ग्रुपच्या सदस्यांसह उपस्थित सर्वांचे आभार मानले. ऐतिहासिक वारशाची ओळख करून देणारा आणि विद्यार्थ्यांमध्ये संस्कार व सांस्कृतिक जाणीव निर्माण करणारा हा उपक्रम उत्साहात पार पडला.